एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धेत प्रत्येक सामन्याला नवे रेकॉर्ड्स रचले जात असून, जुने रेकॉर्ड मोडीत काढले जात आहेत. न्यूझीलंड आणि नेदरलँडविरोधात झालेल्या सामन्यातही असाच एक रेकॉर्ड करण्यात आला आहे. न्यूझीलंडचा खेळाडू मिचेल सँटनर याने शेवटच्या ओव्हरच्या अखेरच्या चेंडूवर 13 धावा ठोकत वर्ल्डकपमध्ये अशक्य अशा रेकॉर्डची नोंद केली आहे. सोमवारी झालेल्या या सामन्यात मिचेलने एका चेंडूत 13 धावा ठोकत एक नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. 


नेमकं काय झालं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवारी न्यूझीलंड विरुद्ध नेदरलँड असा सामना पार पडला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 300 चा टप्पा ओलांडला होता. नेदरलँडरचा बास डी लीडे शेवटची ओव्हर टाकत होता. यावेळी समोर मिचेल सँटनर फलंदाजी करत होता. अखेरचा चेंडू शिल्लक असताना न्यूझीलंडची धावसंख्या 309 वर 7 विकेट होती. यावेळी बास डी लीडेने फुलटॉस टाकला असताना मिचेल सँटनरने लाँग ऑनला षटकार ठोकला. बॉल जास्त उंच असल्याने अम्पायरने नो-बॉल दिला आणि न्यूझीलंडला फ्री हिट मिळाला. दरम्यान मिचेल सँटनरने फ्री हिटमध्ये पुन्हा फुल टॉस मिळालेल्या चेंडूवरही तीच कामगिरी केली आणि षटकार ठोकला. 


यामुळे शेवटच्या एका चेंडूत लगावलेले दोन षटकार आणि नो-बॉलवर मिळालेली एक धाव अशाप्रकारे मिचेल सँटनरने एकूण 13 धावा ठोकत एक नवा रेकॉर्ड केला. 



मिचेल सँटनरने फक्त फलंदाजीच नाही, तर गोलंदाजीतही कमाल केली. अष्टपैलू कामगिरी करत मिचेल सँटनरने नेदरलँडचे पाच विकेट्स घेतले. यामुळे न्यूझीलंडने हैदराबादला झालेल्या सामन्यात 99 धावांनी विजय मिळवला. 


31 वर्षीय मिचेल सँटनरने 17 चेंडूत 36 धावा ठोकत संघाला 322 धावसंख्या उभारण्यास मदत केली. तसंच 59 धावांवर 5 विकेट्स मिळवत गोलंदाजीतही कमाल केली. नेदरलँड संघ 322 धावांचा पाठलाग करताना 223 धावांवर सर्वबाद झाला. या विजयासह न्यूझीलंड संघाने सलग दोन सामने जिंकले आहेत. याआधी न्यूझीलंडने गतवर्षीचे विजेते इंग्लंड संघाचा अहमदाबादमधील सामन्यात पराभव केला होता. 


"आम्ही प्रथम फलंदाजी करताना फार चांगली कामगिरी केली. आघाडीच्या फलंदाजांनी मोठी भागीदारी केली. तसंच गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली," असं न्यूझीलंडच्या कर्णधाराने सांगितलं.