कोण विराट कोहली? रोनाल्डोचा प्रश्न ऐकताच Youtuber ने दिलं उत्तर, फोटो दाखवत म्हणाला `बाबर आझमपण...`
गुगलच्या 25 वर्षांच्या इतिहासात सर्वाधिक सर्च झालेल्या विषयांमध्ये जेव्हा कधी क्रिकेटपटूंचा उल्लेख येतो तेव्हा विराट कोहलीचं नाव पहिल्या क्रमांकावर येतं.
विराट कोहली हा फक्त भारतात तर नाही तर जगभरातील अनेक नवोदित खेळाडू आणि क्रिकेट चाहत्यांसाठी आदर्श आहे. आपल्या फिटनेस आणि खेळीने तो नेहमीच क्रिकेटरसिकांना मंत्रमुग्ध करत असतो. गुगलच्या 25 वर्षांच्या इतिहासात सर्वाधिक सर्च झालेल्या विषयांमध्ये जेव्हा कधी क्रिकेटपटूंचा उल्लेख येतो तेव्हा विराट कोहलीचं नाव पहिल्या क्रमांकावर येतं. सचिन तेंडुलकर, एम एस धोनी, रोहित शर्मा हे भारतीय क्रिकेटच्या महान खेळाडूंमध्ये असले तरी जेव्हा गुगल सर्च आणि सर्वात प्रसिद्ध खेळाडूचा उल्लेख होतो तेव्हा विराट कोहली हेच नाव घेतलं जातं.
विराट कोहलीची ही प्रसिद्धी त्याचं सोशल मीडिया अकाऊंट पाहिलं तरी लक्षात येते. इंस्टाग्रामवर त्याचे करोडो फॉलोअर्स आहेत. त्यामुळेच जर एखाद्या व्यक्तीला विराट कोहली कोण हे माहिती नसेल तर आश्चर्य वाटणं साहजिक आहे. ब्राझिलचा महान फुटबॉलपटू रोनाल्डो याने एका मुलाखतीत आपण विराट कोहलीला ओळखत नाही असं सांगितल्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. रोनाल्डो आणि युट्यूबरमध्ये झालेल्या संभाषणाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
युट्यूबर स्पीड आणि रोनाल्डो यांच्यात हा संवाद झाला आहे. नेमकं काय बोलणं झालं हे जाणून घ्या.
तू विराट कोहलीला ओळखतो का? अशी विचारणा स्पीड करतो. त्यावर रोनाल्डो कोण? अशी विचारणा करतो. त्यावर स्पीड म्हणतो, भारतातील विराट कोहली. यानंतर रोनाल्डो स्पष्टपणे नाही असं सांगतो. त्यावर स्पीड आश्चर्यचकित होतो आणि तुला विराट कोहली कोण माहिती नाही? असं पुन्हा एकदा आश्चर्याने विचारतो. त्यावर रोनाल्डो विचारतो, 'कोण आहे तो? खेळाडू आहे का?'. त्यावर स्पीड तो क्रिकेटर असल्याचं सांगतो.
तो इथे इतका प्रसिद्ध नाही असं स्पष्टीकरण रोनाल्डो देतो. त्यावर स्पीड सांगतो की, तो सर्वोत्तम खेळाडू आहे. तो बाबर आझमसारखा आहे. तू त्याला कधी पाहिलं नाहीस का?. यानंतर स्पीडने फोटो दाखवला असता रोनाल्डोची ओळख पटते.
2022 टी-20 वर्ल्डकपनंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा या फॉरमॅटमधून बाहेर पडतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती. पण बीसीसीआयने दोन्ही खेळाडूंना अफगाणिस्तानविरोधातील टी-20 मालिकेत संधी देत ते आगामी वर्ल्डकप खेळतील असे संकेत दिले आहेत.
Cricbuzz ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआयच्या निवडकर्त्यांनी विराट कोहलीशी त्याच्याकडून असलेल्या अपेक्षांबाबत चर्चा केली. यावेळी टी-20 फॉरमॅटमधील त्याच्या भूमिकेबद्दल चर्चा करण्यात आली. बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी केपटाऊनमध्ये त्याची भेट घेतली होती. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांच्यासोबतही अशी चर्चा झाली का याबद्दल काही स्पष्टता समोर आलेली नाही. विराट कोहलीने 115 सामन्यात 52.73 च्या सरासरीने 4008 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 137.96 आहे.