Car Price Hike : सर्वसामान्यांना स्वत:ची कार, स्वत:चं घर या गोष्टींचं प्रचंड कुतूहल. शक्य होईल त्या मार्गानं पैसे साठवत आणि त्याच पैशांतून एक एक स्वप्न पूर्ण करत टप्प्याटप्प्यानं चांगल्या आयुष्याच्या दिशेनं जाणाऱ्या याच सर्वसामान्यांना आता झटका लागणार आहे. कारण, एका बड्या कार उत्पादक कंपनीकडून कारच्या किंमतींमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळं अनेकांसाठीच आता कारचं स्वप्न शब्दश: महाग होणार आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टाटा आणि मारुती या कार निर्मात्या कंपन्यांकडून नव्या वर्षापासून वाहनांच्या दरांमध्ये वाढ होणार असल्याचं सांगण्यात येत असतानाच आता त्यामागोमाग होंडा कार्स इंडिया (Honda Cars India) नंही अशीच एक घोषणा केली. कंपनीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार होंडाकडून एलिवेट, सिटी आणि अमेझ अशा मॉडेल्सचे दर वाढू शकतात. 


दरवाढीमागं मोठं कारण 


होंडा कार्सच्या मार्केटिंग आणि सेल्सचे उपाध्यक्ष कुणाल बहल यांनी वृत्तसंस्थांशी संवाद साधताना यासंदर्भातील माहिती दिली. कंपनीकडून कार निर्मितीसाठीच्या प्रक्रियेत दरवाढ होत असल्यामुळं खर्च वाढत आहे. ज्यामुळं अतिरिक्त खर्चाचा हा भार कमी करण्यासाठी म्हणून डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत विविध मॉडेलच्या कार दरांमध्ये वाढ करण्यात येईल. सध्या असणारे होंडा कारचे दर 23 डिसेंबरपर्यंतच लागू राहणार आहेत. त्यामुळं आता तुम्ही होंडाची एखादी कार घेण्याच्या विचारात असाल तर, आताच जास्तीची रक्कम आणि त्याचा तुमच्यावर येणारा आर्थिक भार लक्षात घ्या. 


हेसुद्धा वाचा : ऑक्टोबर नव्हे, आधी डिसेंबर होता 10 वा महिना; मग तो 12 व्या स्थानी कसा गेला?


सर्वसामान्यांचं स्वप्न महागलं... 


Tata Motors नं काही दिवसांपूर्वीच त्यांच्या पॅसेंजर आणि इलेक्ट्रीक वाहनांच्या दरांमध्ये 2024 पासून वाढ होणार असल्याचं स्पष्ट केलं. तर, मारुती सुझुकीच्या कारही 1 जानेवारीपासून महागणार आहेत. थोडक्यात कार खरेदीचा विचार करणंही आता अनेकांनाच घाम फोडणारं ठरेल हेच स्पष्ट होत आहे. जागतिक स्तरावर महागाईचा आगडोंब माजलेला असतानाच आता कार उत्पादक कंपन्यांनाही याचा फटका बसताना दिसत आहे. त्यामुळं येत्या काळात कार खरेदी करण्यापूर्वी दोनदा विचार करा... कारण कार घेण्याचं स्वप्न महागलंय!