Anand Mahindra Thar-E On Moon: सोशल मीडियावर सर्वाधिक सक्रीय असलेल्या उद्योग जगतामधील व्यक्तींची नावं घ्यायची झाल्यास महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे (Mahindra and Mahindra) सर्वेसर्वा आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांच्या नावाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. ते अनेकदा चालू घडामोडींसंदर्भातील आपलं मत मांडण्यापासून ते वेगवेगळ्या हटके गोष्टींपर्यंत बऱ्याच गोष्टी आपल्या 'एक्स' म्हणजेच ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करत असतात. आनंद महिंद्रांचे ट्वीट्स हे कायमच चर्चेत असतात आणि अनेकदा बातम्यांचा विषयही ठरतात. सोशल मीडियावर त्यांचा मोठा चाहता वर्ग असून त्यांनी पुन्हा एकदा शेअर केलेला एक व्हिडीओ या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. 


10 सेकंदांचा व्हिडीओ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आनंद महिंद्रांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच 'इस्रो'चं 'चांद्रयान-3' मोहिमेच्या यशासंदर्भात अभिनंद केलं आहे. 'इस्रो'चं अभिनंदन करतानाच आनंद महिंद्रांनी आपलं एक मोठं स्वप्न नेटकऱ्यांबरोबर शेअर केलं आहे. आनंद महिंद्रांना त्याच्या कंपनीची नवी थार-ई नावाची इलेक्ट्रीक कार चक्क चंद्राच्या पृष्ठभागावर पाहण्याची इच्छा असल्याचं म्हटलं आहे. हे सांगताना आनंद महिंद्रांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा अॅनिमेटेड व्हिडीओ अवघ्या 10 सेकंदांचा आहे. या व्हिडीओमध्ये एक लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उभं असल्याचं दिसत आहे. हळूहळू या लँडरचा दरवाजा उघडतो आणि या लँडरमधून एक महिंद्रा अँड महिंद्राची नवी थार-ई उतरताना दिसते. ही कार चंद्राच्या पृष्ठभागावर उतरुन थोडं अंतर चालते आणि थांबते.


कॅप्शनही चर्चेत


आनंद महिंद्रांनी हा व्हिडीओ शेअर करताना दिलेल्या कॅप्शनमध्ये 'इस्रो'चे आभार मानले आहेत. "आमच्या महत्त्वकांक्षांना पंखांचं बळ देण्यासाठी इस्रोचे आभार. भविष्यात एक दिवस आम्ही चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रम आणि प्रज्ञानच्या बाजूला थार-ई ला उतरताना पाहू आणि असंख्य शक्यता पडताळू," अशी इच्छा आनंद महिंद्रांनी व्यक्त केली आहे. आनंद महिंद्रांनी हा मिम व्हिडीओ शेअर करणाऱ्या प्रताप बोस यांचेही आभार या कॅप्शनमध्ये मानलेले आहेत.



काही दिवसांपूर्वीच जगासमोर आणली ही कार


महिंद्रा अँड महिंद्राची उपकंपनी असलेल्या महिंद्रा इलेक्ट्रिक ऑटोमोबाईल्स लिमिटेडने मागील महिन्यामध्ये जागतिक स्तरावरील फ्यूचरस्केप कार्यक्रमाध्ये थार गाडीचं इलेक्ट्रिक व्हर्जन कसं असेल याची पहिली झलक जगाला दाखवलेली. भविष्यात 5 दरवाजे असलेली ही इलेक्ट्रिक कार प्रत्यक्षात रस्त्यावर धावताना दिसेल. महिंद्रा कंपनीने एक्सप्लोअर द इम्पॉसिबल फिलॉसॉफी नावाने इलेक्ट्रिक थारचा फर्स्ट लूक आणि डिझाइन पहिल्यांदाच जगासमोर आणले.



आता हीच गाडी भविष्यात चंद्रावर पाहण्याची आनंद महिंद्रांची इच्छा आहे.