Googleचा चीनला झटका, २५०० पेक्षा जास्त यूट्यूब चॅनेल्स केले डिलीट
गूगलने (Google) चीनला चांगला दणका दिला आहे. गूगलने चीनची २५०० पेक्षा जास्त यूट्यूब चॅनेल्स डिलीट केली आहेत.
वॉशिंग्टन : चीन विरोधात भारताने आक्रमकपणा घेतल्यानंतर अमेरिकाही अधिक आक्रम झाली आहे. भारतानंतर अमेरिकेने चीनच्या TikTok वर बंदी घातली. आता गूगलने (Google) चीनला चांगला दणका दिला आहे. गूगलने चीनची २५०० पेक्षा जास्त यूट्यूब चॅनेल्स डिलीट केली आहेत. त्यामुळे चीनला याचा मोठा फटका बसणार आहे.
गूगलकडून सांगण्यात आले आहे की, चीनशी संबंधित२५०० पेक्षा जास्त यूट्यूब चॅनेल्स डिलीट केले आहेत. ( Google says it has deleted more than 2,500 YouTube channels tied to China as part of its effort to weed out disinformation on the video-sharing platform.) चुकीच्या आणि खोट्या बातम्या पसरवत असल्याचे कारण देत गूगलकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
गूगलने हटविलेले यूट्यूब चॅनेल्स स्पॅमी आणि बिगर राजकीय कंटेन्ट पोस्ट करत होते. तसेच, यामधील काही भाग राजकारणाशी संबंधित होता. दिशाभूल करणारे व्हिडिओ चीनने यूट्यूब प्लॅटफॉर्मवर शेअर केल्याचे कारण देत गूगलने हा व्हिडिओ स्ट्राईक करत २५०० हून अधिक चॅनेल डिलिट केले आहेत.
चॅनेल्स तपासणीच्या कामादरम्यान गूगलला काही व्हिडिओ चॅनेल संदर्भात माहिती मिळाली. त्यानंतर गूगलने योग्य ती खातरजमा करुन एप्रिल ते जून या तिमाहीत हे यूट्यूब चॅनेल हटवले आहेत. आपल्या तिमाही अहवालात गूगलने यासंदर्भात माहिती दिली आहे.
कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावानंतर अमेरिका आणि चीनमधील संबंध बिघडले गेले आहेत. मतभेद अगदी टोकाला गेले आहेत. त्यामुळे भारतानंतर अमेरिकेने चीनच्या TikTok वर बंदी घातली होती. तसेच अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. यापार्श्वभूमीवर अमेरिकेकडून खबरदारी घेण्यात आली आहे.