इन्स्टाग्रामवर सुरूये मोठा स्कॅम! सायबर चोरांची तुमच्या बँक अकाउंटवर नजर, आत्ताच सावध व्हा
Instagram Phishing Scam: इन्स्टाग्रामवरही हल्ली सायबर चोरट्यांची नजर पडली आहे. मेसेजच्या माध्यमातून युजर्सचा पर्सनल डेटा चोरी करण्याचा प्रयत्न केला जातो.
Instagram Phishing Scam: इन्स्टाग्राम हे सध्या लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. फोटो शेअरिंग आणि रिल्स पाहण्यासाठी इन्स्टाग्रामचा वापर युजर्सकडून मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. पण इन्स्टाग्रामवर सध्या एक मोठ्याप्रमाणात फिशिंग स्कॅम सुरू आहे. या प्लॅटफॉर्मवरुन लोकांना पैशांचं आमिष दाखवून संवेदनशील माहिती चोरी करण्याचे प्रमाण वाढले आहे. ज्यामुळं कोणत्याही प्रकारचा फ्रॉड होऊ शकतो. इन्स्टाग्रामवर गेल्या काही दिवसांपासून असे फ्रॉड होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळं तुम्हीदेखील इन्स्टाग्राम वापरत असाल तर या गोष्टींची काळजी घ्या.
इन्स्टाग्रामवर अनेकदा स्कॅमर्स मोफत भेटवस्तू, गिफ्ट किंवा अकाउंट व्हेरिफिकेशनच्या नावाखाली बनावट लिंक पाठवतात. तसंच, या लिंकवर क्लिक करण्यासाठी आमिष दाखवतात. या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमची ऑनलाइन अॅक्टिव्हिटी ट्रॅक होऊ शकते. त्यामुळं चुकूनही अशा लिंकवर क्लिक करणे टाळा.
इन्स्टाग्रामवर जर तुम्हालाही अज्ञात व्यक्तीचा मेसेज आला असेल तर आत्ताच सतर्क व्हा. अज्ञात व्यक्तीच्या मेसेजवर क्लिक करण्यापूर्वी त्याची पूर्ण प्रोफाइल चेक करा. ते अकाउंट व्हेरिफाइड आहे का. त्याच्या अकाउंटवरील कंटेट आणि फॉलोअरवर देखील लक्ष देणे गरजेचे आहे. जर तुम्हाला काही गोष्टी खटकत असतील तर त्याच्या मेसेजवर कोणताही रिप्लाय देऊ नका. तसंच, त्याचे अकाउंट ब्लॉक करा.
खासगी माहिती देऊ नका
सायबर चोरटे अनेकदा तुमचा पासवर्ड, क्रेडिट कार्डसारखी खासगी माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करतात. ती मिळवण्यासाठी तुम्हाला इतर गोष्टींचे आमिषही दाखवतात. त्यामुळं अशी माहिती कधी चुकूनही देऊ नका किंवा तुमच्या कंटेटमध्येही देऊ नका.
ओटीपी कधी देऊ नका
इन्स्टाग्रामवर कोणत्याही प्रकारचे व्हेरिफिकेशन होत नसते. अशावेळी कोण्या अज्ञात व्यक्तीसोबत तुमच्या फोनवर आलेला ओटीपी देऊ नका.