सुस्मिता भदाणे, झी मीडिया, मुंबई : सध्या सगळीकडे चर्चा आहे, 'पबजी' या गेमची. अर्थात या गेमचे अनेक मुलांना जणू व्यसन लागल्यासारखे तो खेळताना दिसतात. मात्र या पबजीमुळे पुन्हा एकदा गेम खेळणारी ही मुले नवनवीन धोक्यांना आमंत्रण देताना दिसत आहेत. मुंबई माझगावचे अरुण गुजर यांच्यावर काही दिवसांपूर्वी अज्ञात तरुणाने बंदुकीने हल्ला केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अरुण गुजर यांच्यावरील हल्ला ही जरी मुंबईतील एक साधी घटना भासत असली, तरी या हल्ल्या मागचं कारण आहे, पबजी हा ऑनलाईन गेम. 


काय आहे पबजी?


तरुणाईच्या भाषेत बोलायचं, तर सध्या ‘इन ट्रेण्ड’ असलेला ‘पबजी’ हा व्हिडीओ गेम. अर्थात ८० टक्क्य़ांहून अधिक अ‍ॅक्शन गेम्सप्रमाणे हा गेमही हिंसक असा म्हणजेच मारामारी आणि शस्त्रं घेऊन व्हर्च्युअल (आभासी) जगामध्ये वावरण्यासंदर्भातच आहे. 


हा गेम रीलीज होऊन पाच-सहा महिने लोटले आहेत. मात्र भारतामध्ये हा गेम मागील महिन्याभरापासून चर्चेचा विषय ठरला आहे. अनेक जण सध्या त्यांच्या मोबाइलवर रात्री जागरण करून हा गेम खेळताना दिसत आहेत आणि नेहमीप्रमाणे अनेक पालकांना या गेमबद्दल पुरेशी माहितीही नाही.


अशा प्रकारे एखादा गेम व्हायरल होऊ न केवळ, त्याची अन् त्याचीच चर्चा होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. मागील दोन-तीन वर्षांच्या कालावधीमध्ये असे अनेकदा झाले आहे. मनोरंजाच्या पलीकडे एक व्यसन जे तरुणांना त्यांच्या कुटुंबियांपासून मित्रांपासून दूर आभासी जगात जगायला लावताय 


अनेकदा हा गेम स्वस्थ बसू देत नाही. सतत पुढील पातळी पार करावी किंवा आणखी एक गेम खेळावा, अशी इच्छा उत्पन्न होते. बऱ्याचदा काम सोडून गेम खेळला जातो. रात्री एका गेमच्या बोलीवर सुरू केलेला खेळ पहाटेपर्यंत चालतो. खेळण्याची पद्धत सोपी असल्याने अनेकांना हा गेम आकर्षित करतोय.


पबजी गेममध्ये नेमकं असतं तरी काय?


पबजी (PUBG) हा शब्द ‘पब्लिक अननोन बॅटल फिल्ड’ या टर्मचा शॉर्टकट आहे. अर्थात गेमच्या नावावरूनच अनोळखी लोकांशी मारामारी करणे, हा या गेमचा मूळ उद्देश असतो हे समजतं. 


आकर्षक व्हिज्युअल्स आणि सतत होत राहणाऱ्या अ‍ॅक्शनमुळे तरुणाईला या गेमची भुरळ पडली आहे. 


या गेममध्ये लाइव्ह चॅट या पर्यायामुळे मुलं अनोळखी लोकांशी संवाद साधतात हा सर्वात मोठा धोका आहे. त्यामुळे हा गेम खेळणाऱ्यांनी आपण कोणाशी संवाद साधतोय, आपली माहिती कोणाला देतोय याबद्दल सतर्क राहणे गरजेचे आहे. 


आपल्या फेसबुक मित्रांबरोबर टीम करून हा गेम खेळता येतो. म्हणूनच अनेक जण वेळ ठरवून भेटतात ते या गेमच्या प्लॅटफॉर्मवर. या गेमचे वैशिष्टय़ म्हणजे हा गेम खेळताना आपल्या पार्टनरशी लाइव्ह चॅटिंगही करता येतं. 


तरुणांनी हे गेम खेळायला हरकत नसली तरी ते किती वेळ खेळायचे, याला मर्यादा आहेत. तुमच्या दिवसभराच्या कामातून तुम्ही केवळ एक तास गेम खेळत असाल तर, विरंगुळा म्हणून ही बाब सामान्य आहे. 


पण त्यापेक्षा अधिक काळ काम बाजूला ठेवून हा गेम खेळला जात असेल, तर तरुण त्याच्या आहारी जात आहेत. यामुळे तुमची मुलं आभासी जगालाच आपलंस करतील.