नवी दिल्ली : रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांच्या नेतृत्त्वाखालील रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड या कंपनीने तिसऱ्या तिमाहीत जबरदस्त नफा कमावला आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या एका निर्णयामुळे कंपनीला खूप मोठा फायदा झाल्याचं पहायला मिळालं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोदी सरकारच्या एका निर्णयामुळे जिओला थेट नफा झाला आहे. रिलायन्स जिओने तीन महिन्यांत इतकं उत्पन्न कमवलं की कंपनीला ५०० कोटी रुपयांचा नफा झाला. 


कुठल्या निर्णयामुळे झाला फायदा?


ऑक्टोबर २०१७ मध्ये ट्रायने घेतलेल्या निर्णयामुळे टेलिकॉम कंपन्यांपैकी रिलायन्स जिओला सर्वात मोठा फायदा झाला. ट्रायने ऑक्टोबर २०१७ मध्ये इंटरकनेक्शन युसेज चार्ज (आययूसी) मध्ये ५७% ची कपात केली होती. त्यामुळे जिओला ऑक्टोबर-डिसेंबर या तिमाहीत १०५८ कोटी रुपयांची बचत झाली.


तसेच जिओचा ऑपरेटिंग नफा ९०% वाढला. तर, गेल्या तिमाहीत म्हणजेच जुलै-सप्टेंबर या तिमाहीत कंपनीला २७१ कोटी रुपयांचा तोटा झाला होता.


असं झालं इतर कंपन्यांचं नुकसान


ट्रायने घेतलेल्या IUCच्या निर्णयामुळे एअरटेल, आयडिया, वोडाफोन सारख्या इतर टेलिकॉम कंपन्यांना मोठं नुकसान झालं. ऑक्टोबरपर्यंत आययूसीसाठी जिओने मोठी रक्कम मोजली होती आणि याचा फायदा इतर कंपन्यांना झाला होता. मात्र, आययूसीत कपात झाल्याने इतर कंपन्यांना मोठं नुकसान झालं.


रिलायन्स जिओने स्वस्त आणि मस्त प्लान्स लॉन्च केल्यामुळे आधीच इतर कंपन्यांना नुकसान होत होतं. त्यातच आता आययूसीच्या निर्णयामुळे या कंपन्यांना मोठा झटका बसला आहे.


इतर कंपन्यांचा नफा झाला कमी


जिओने सुरुवातीपासूनच फ्री डेटा आणि वॉईस कॉल्सची सुविधा दिली. त्यामुळे इतर कंपन्यांना मोठा झटका बसला आणि त्यांच्या उत्पन्नात घट झाली. यानंतर टेलिकॉम सेक्टरमध्ये डेटा वॉर सुरु झालं. या डेटा वॉरमध्ये कंपन्यांचा खर्च वाढत गेला मात्र, त्याचं उत्पन्न घटत गेलं.


वाढला जिओचा ARPU


सुरुवातीला फ्री डेटा आणि वॉईस कॉलिंगची सुविधा देणाऱ्या जिओचं महसूल आता येण्यास सुरुवात झाली आहे. जिओचं (Average Revenue per User) म्हणजेच प्रत्येक युजरमागे सरासरी महसूल १५४ रुपये आहे. तर, एअरटेलचा ARPU १२३ रुपये आहे.