नवी दिल्ली : तुम्ही क्रिप्टोकरंसी बिटकॉईन आणि लिटकॉईनबाबत गेल्या काही दिवसात खूपकाही ऎकलं असेल. यात गुंतवणूक केल्याने मोठ्या प्रमाणात रिटर्न मिळत असल्याचा दावा केला जातोय. मात्र भारतात आयबीआयने ब्रिटकॉईन चलनात गुंतवणूक न करण्याचा सल्ला दिलाय. आता अशी बातमी समोर येतीये की, रिलायन्स जिओही अशीच एक करन्सी सुरू करणार आहे. 


काय आहे प्रोजेक्ट?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीडिया रिपोर्टनुसार, टेलिकॉम इंडस्ट्रीत धमाका केल्यानंतर रिलायन्स जिओ आपली क्रिप्टो करन्सी आणण्याचा प्लॅन करत आहे. या क्रिप्टोकरन्सीचं नाव जिओ कॉईन ठेवलं जाणार आहे. अशीही माहिती आहे की, या प्रोजेक्टचं नेतृत्व मुकेश अंबानी नाहीतर त्यांचा मुलगा आकाश अंबानी करणार आहे. 


कंपनीकडून बोलण्यास नकार


लाईव्ह मिंटने दिलेल्या वॄत्तानुसार, आकाश अंबानीच्या नेतृत्वात ५० प्रोफेशनल्सची टीम तयार केली जात आहे. या टीमचं वयोगट २५ वर्ष असेल. झी मीडियाने या बातमीबाबत कंपनीकडे विचारणा केली तेव्हा कंपनीच्या प्रवक्त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. 


क्रिप्टो करन्सीचं चलन वाढलं


असे मानले जात आहे की, रिलायन्स जिओने हा निर्णय जगभरात क्रिप्टो करन्सीचं चलन वाढत असल्याचं पाहून घेतलाय. मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी याच्या नेतॄत्वातील टीम क्रिप्टो करन्सीसाठी आवश्यक ब्लॉकचेन निर्माण करतील आणि त्याच्या तांत्रिक बाजूंकडे लक्ष ठेवतील. या सप्लाय चेनमध्ये सहभागी होणा-या ‘जिओ कॉईन’च्या माध्यमातून खरेदी-विक्री केली जाऊ शकते. 


क्रिप्टो करन्सी भारतात वैध नाही


अर्थमंत्र्यांनी संसदेत सांगितले होते की, २०१३ ते २०१७ पर्यंत आरबीआय आणि सरकारचं धोरण स्पष्ट होतं की, बिटकॉईनसारखी क्रिप्टो करन्सी भारतात वैध नाहीये. यातून फसवणूक केली जाण्याची शक्यता आहे. 


जवळपास ७८५ क्रिप्टो करन्सी चलनात


अर्थमंत्र्यांनी सांगितले होते की, सध्या ७८५ क्रिप्टो करन्सी चलनात आहेत. आरबीआयने इशारा देत सांगितले होते की, बिटकॉईनसारख्या करन्सीला मान्यता दिली गेलेली नाही. यात गुंतवणूक करणे धोकादायक असू शकतं.