Valentines day : प्रिय व्यक्तीला द्या अविस्मरणीय भेट; TATA Nexon ev ची किंमत एक लाखांनी कमी
TATA Nexon ev : जबरदस्त! टाटाच्या ईव्ही आणखी स्वस्त होणार. नेक्सन ईव्ही, टीयागो ईव्ही खरेदी वाढवण्यासाठी महागाईच्या जमान्यात टाटा मोटर्सचा मास्टर स्ट्रोक
निनाद झारे, झी मीडिया, मुंबई : (TATA Nexon ev) व्हेलेंटाईन डे (Valentines day 2024) च्या निमित्तानं तुम्हीही प्रिय व्यक्तीला एखादी खास आणि अविस्मरणीय भेट देण्याच्या बेतात असाल, तर हा एक कमाल पर्याय ठरू शकतो. कारण, तुम्ही प्रिय व्यक्तीला चक्क एक कारही भेट देऊ शकता. त्याशिवाय तुम्ही जर इलेक्ट्रिक व्हेईकल घेण्याच्या विचारात असाल तर ही आनंदाची बातमी. टाटा मोटर्सच्या दोन सर्वात लोकप्रिय इलेक्ट्रिक गाड्या (TATA Nexon ev) नेक्सॉन ईव्ही आणि टियागो ईव्ही या दोन्ही गाड्यांच्या विविध मॉडल्सच्या किंमती कमी करण्याचा निर्णय कंपनीने जाहीर केलाय.
जागतिक बाजारात इलेक्ट्रिक गाड्यांसाठी लागणाऱ्या बॅटऱ्यांची किंमत कमी झाल्याने त्याचा फायदा ग्राहकांना देण्याचा निर्णय कंपनीनं घेतलाय. नुकत्याच बाजारात आलेल्या पंच ईव्हीच्या किंमती मात्र कमी होणार नाहीत असंही कंपनीनं स्पष्ट केलंय. देशात टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक गाड्या सर्वात लोकप्रिय आहेत.
नेमकी किती कमी होणार किंमत
एन्ट्री लेव्हल टियागो (Tiago EV) ईव्हीची किंमत 70 हजाराने कमी करण्यात येणार आहेत. तर टियागो ईव्हीच्या टॉप एन्डच्या किंमतीत 20 हजाराची कपात जाहीर झाली आहे. त्यामुळे एन्ट्रीलेव्हल टियागो ईव्ही 7 लाख 99 हजार (Ex showroom) तर टॉप एन्ड टियागो ईव्ही 11 लाख 39 हजार (Ex Showroom) असेल. कंपनीच्या सर्वाधिक खपाची नेक्सॉन ईव्हीसुद्धा स्वस्त झालीय. एन्ट्री लेव्हल नेक्सॉन ईव्ही 25 हजारांनी तर टॉप एन्ड नेक्सॉन ईव्ही 70 हजारांनी स्वस्त करण्याचा निर्णय टाटा मोटर्सनी घेतलाय.
हेसुद्धा वाचा : Mumbai News : 'या' अटीची पूर्तता होताच अटल सेतूवरून शिवनेरीचा सुसाट प्रवास शक्य; मुंबई- पुण्याचं अंतर आणखी कमी
नॅक्सॉन ईव्हीचे फिअरलेस एल आर या मॉडलची किंमत तब्बल 1 लाख 20 हजार रुपयांनी कमी करण्यात आली आहे. नॅक्सॉन ईव्हीचे फिअरलेस एल आर या मॉडल सध्या 19 लाख 19 हजाराला उपलब्ध आहे. किंमत कमी झाल्याने आता हे मॉडल 17 लाख 99 हजार (Ex Showroom) ला उपलब्ध असणार आहे.
बॅटरीच्या किंमती कमी का झाल्या?
इलेक्ट्रीक गाड्यांमध्ये प्रामुख्याने लिथियम आयन बॅटरीचा वापर होतो. गेल्या काही महिन्यात जागतिक बाजारात लिथियमच्या किंमती 14 टक्के घसरल्या आहे. लिथिमय हा धातू प्रामुख्याने दक्षिण अमेरिका आणि अफ्रिकेत मोठ्याप्रमाणात सापडतो. तेथूनच आयात करुन विविध बॅटरी निर्माते इलेक्ट्रीक गाड्यांसाठी बॅटरी बनवतात.
इलेक्ट्रीक गाड्यांच्या किंमतींमध्ये बॅटरीचीच किंमत सर्वात महत्वाची असते. त्यामुळेच लिथियमच्या किंमतीमधील कपातीचा थेट फायदा ग्राहकांना मिळतो. दरम्यान, एमजी मोटर्स इंडियाने (Morris Garage Motors India) ही भारतात दुसऱ्या क्रमांकाची इलेक्ट्रिक गाड्या विकणारी कंपनी आहे. त्यांनीही 6 फेब्रुवारीला त्यांच्या फ्लीटमधील गाड्यांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय जाहीर केला होता. तेव्हा आता कारच्या कमी झालेल्या किमती पाहता कारच्या कोणत्या मॉडेलचा सर्वाधिक खप होतो हे पाहणं महत्त्वाचं असेल.