'या' अटीची पूर्तता होताच अटल सेतूवरून शिवनेरीचा सुसाट प्रवास शक्य; मुंबई- पुण्याचं अंतर आणखी कमी

Atal Setu News : मुंबईकरांच्या सेवेत दाखल झालेल्या अटल सेतू अर्थात शहरातील नव्या सागरी सेतूवरून प्रवास करण्याचं आणखी एक माध्यम तुमच्या सेवेत येणार आहे. 

सायली पाटील | Updated: Feb 14, 2024, 08:09 AM IST
'या' अटीची पूर्तता होताच अटल सेतूवरून शिवनेरीचा सुसाट प्रवास शक्य; मुंबई- पुण्याचं अंतर आणखी कमी  title=
mumbai news msrtc shivneri bus to travel from atal setu latest news

Atal Setu News : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेल्या अटल सेतूमुळं मुंबई आणि नवी मुंबई ही दोन्ही शहरं अगदी जवळ आली आणि प्रवासाचा वेळ अवघ्या 20 मिनिटांवर आला. तासाभराचा प्रवास आता काही मिनिटांतच शक्य झाल्यामुळं या सागरी सेतूवरून प्रवास करणाऱ्यांचा आकडाही तितकाच मोठा आहे. गेल्या काही दिवसांमध्ये MTHL वरून बऱ्याच वाहनांनी आणि अर्थातच प्रवाशांनी प्रवास केला. 

मुंबईच्या बेस्ट बससाठीही हा मार्ग फायद्याचा ठरणार असून, सध्या प्रशासन त्यासाठीही चाचपणी करताना दिसत असतानाच आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अटल सेतूवरून शिवनेरी बसचा प्रवास शक्य आहे. एका प्राथमिक अटीची पूर्तता होताच हा प्रवास शक्य असल्यामुळं आता मुंबई- पुणे प्रवास करणाऱ्या मंडळींसाठी ही आनंदाचीच बातमी आहे असं म्हणणं गैर ठरणार नाही.

शहरातील विविध भागांमध्ये असणाऱ्या वाहतूक कोंडीतून यामुळं प्रवाशांची सुटका होणार असून, त्यांना वेळेआधीच अपेक्षित स्थळी पोहोचणं शक्य होणार आहे. तेव्हा आता विचाराधीन असणाऱ्या या प्रवासमार्गावरून प्रत्यक्षात शिवनेरी कधी धावते हे पाहणं औत्सुक्याचं असेल. 

कोणत्या अटीची पूर्तता गरजेची? 

अटल सेतूवरून मुंबई-पुणे एसटी (शिवनेरी) सुरू करण्याचा विचार दृष्टीक्षेपात असून, बस निघताना मुंबईतच त्यामध्ये 45 प्रवासी बसल्यास अटल सेतूवरून ती सहज पुणे गाठू शकते. मुंबई आणि पुण्यातील अंतर कमी करत प्रवाशांचा वेळ वाचवण्यासाठी अटल सेतूवरून एसटी चालवण्याचा विचार गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. किंबहुना एसटी महामंडळाने त्यासाठीचं सर्वेक्षण ही केलं आहे. 

हेसुद्धा वाचा : Mumbai News : मुंबईकरांच्या भल्यासाठीच अटल सेतूवर एसटी धावत नाही; समोर आलं खरं कारण

प्राथमिक स्तरावर मुंबई-पुणे (Mumbai Pune Shivneri) प्रत्येकी तीन फेऱ्यांमागे एक फेरी अटल सेतूवरून चालवण्याचं नियोजन आहे. शिवनेरीच्या काही फेऱ्या प्रायोगिक तत्त्वावर दादर- शिवडी-अटल सेतू-उलवे-पनवेल -पुणे चालवल्या जाऊ शकतात अशी माहितीही सध्या समोर येत आहे. दरम्यान, येत्या काळात बेस्ट बस सोबतच नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे चालवण्यात येणारी बस सुविधाही अटल सेतू मार्गानं पुढे नेण्याचा विचार सुरु आहे. तेव्हा अटल सेतू शहरातील दळणवळणामध्ये मोठा हातभार लावताना दिसणार आहे.