अमर काणे, झी मीडिया, नागपूर: कोरोनामुळे विदर्भात चीनच्या वुहानसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. तरीही सरकारमधील प्रमुख नेत्यांचे लक्ष मुंबई आणि पुण्याकडेच असल्याची उद्विग्नता भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली. ते शुक्रवारी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी बावनकुळे यांनी म्हटले की, नागपूरमधील कोरोनाच्या परिस्थितीकडे सरकारचे लक्ष नाही. येथील जनतेला सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. उद्धव ठाकरे मुंबई पाहतात तर अजित पवार पुणे पाहतात. परंतु, विदर्भाकडे कोणाचेही लक्ष नाही. याठिकाणी लोकांना बेड मिळत नाहीत, ऑक्सिजन नाही, व्हेंटिलेटर नाहीत, लोक रस्त्यावर मरतील, अशी परिस्थिती आहे. चीनमधील वुहानसारखी परिस्थिती याठिकाणी अनुभवायला मिळत आहे, असे बावनकुळे यांनी म्हटले. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत जमावबंदीच्या आदेशानंतर आता पोलिसांकडून वाहनांच्या तपासणीला सुरुवात

काहीवेळापूर्वीच ऊर्जामंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत व कामठीचे आमदार टेकचंद सावरकर यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे विदर्भाशी दुजाभाव होत असल्याचा मुद्दा उपस्थित करून विरोधकांकडून सरकारला घेरले जाण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे यांनी विदर्भातील पूरग्रस्तांना सरकारकडून देण्यात आलेल्या तोकड्या मदतीवरही टीकास्त्र सोडले. पूर्व विदर्भातील पूरग्रस्त नागरिकांना मदत करण्याबाबत राज्य सरकारने काढलेला जीआर पूरग्रस्त नागरिकांची क्रूर थट्टा आहे. राज्य सरकारने विदर्भातील पूरग्रस्तांच्या तोंडाला पानं पुसली आहेत. आम्ही हेक्टरी ५० हजारांची मदत देण्याची मागणी केली होती. पण सरकारने हेक्टरी अवघी साडेसहा हजार रुपयांची मदत दिली. यापूर्वी पश्चिम महाराष्ट्रात जशी मदत केली तशी मदत अपेक्षित होती. मात्र, राज्य सरकारने केलेली मदत म्हणजे येथील शेतकऱ्यांची क्रूर थट्टा असल्याची टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.