नागपूर : जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनेकडून नागपुरातील विविध ठिकाणी रेकी करण्यात आली. महत्वाचे म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाची रेकी करण्यात आली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1 जून 2006 रोजी पहाटे 4 वाजता एम्बेसिडर कारमधून आलेल्या तीन दहशतवाद्यांनी मुख्यालयावर हल्ला केला होता. मात्र, तो नागपूर पोलिसांनी हाणून पाडत तिन्ही दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. यानंतर नागपुरातील महाल परिसरात असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय नेहमीच दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर राहिले आहे. 
 
जैश-ए-मोहम्मदचे काही दहशतवादी महिनाभरापूर्वी श्रीनगरहून नागपुरात आले होते. नागपूरमध्ये एक महिना मुक्काम करून त्यांनी संघ मुख्यालयास काही महत्वाच्या ठिकाणांची रेकी केली. 


काश्मीर खोऱ्यात पकडलेल्या जैशच्या दहशतवाद्याकडून सुरक्षा यंत्रणांना या रेकीची माहिती मिळाली. त्यानंतर नागपूर पोलिसांचे एक पथक श्रीनगरला रवाना झाले. याबाबत नागपूर पोलिसांच्या गुन्हे “अनलॉफूल एक्टिव्हीटी प्रिव्हेन्शन एक्ट” (युएपीए) अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय. 


नागपुरातील महाल परिसरात असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय (मोहिते-वाडा) आणि रेशमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मारक मंदिर, आरबीआय मुख्यालय यांची रेकी केल्याची माहिती पुढे आलीय. याबाबत माहिती मिळताच संघ मुख्यालयाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.


नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी अधिक माहिती देताना सांगितले कि, काही दिवसांपूर्वी जैश-ए-मोहम्मदचे लोक नागपुरात आले होते. त्यांनी नागपुरातील संवेदनशील ठिकाणांची पाहणी केली. यासोबतच अनेक इमारतींची छायाचित्रेही काढण्यात आली आहेत. त्यानंतर अशा ठिकाणांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मात्र, हे प्रकरण संवेदनशील असल्याने त्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला.