मुंबईतील पहिली एसी लोकल जानेवारीत सुरु होणार
मुंबईत पहिली एसी लोकल पुढील वर्षापासून धावत आहे. मात्र पहिली एसी ट्रेन कशी असेल याची उत्सुकता मुंबईकरांना आहे. तिची भाडे किती आणि वेग काय असेल आणि महत्वाचे म्हणजे ती किती वेळ स्टेशनवर थांबणार, अादी अनेक प्रश्न असतील....तर ही बातमी लगेच वाचा.
मुंबई : पहिली एसी लोकल १ जानेवारी २०१८ पासून सुरू होणार आहे. मात्र पहिली एसी ट्रेन कशी असेल याची उत्सुकता मुंबईकरांना आहे.
या गाडीचे व्हीज्युअल्स, व्हीडीओ तुम्ही अनेकदा पाहिले असतील आणि त्यानुसार या गाडीचा आकर्षक निळा रंग कायम राहील का असा प्रश्नही तुम्हाला पडला असेल. त्याचबरोबर या गाडीवर इतर गाड्यांसारख्या जाहिराती चिकटवणार का अशीही काळजी तुम्हाला लागली असेल. त्यामुळे तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी हा रिपोर्ट पाहा.
मुंबईच्या लोकलगाड्यांमधून घामाने निथळत प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना आता एसी लोकलची प्रतिक्षा आहे. ही प्रतिक्षा लवकरच संपेल कारण १ जानेवारीपासून मुंबईच्या सेवेत पहिली एसी लोकल धावणार आहे.
मात्र केवळ वातानुकुलीत प्रवास हे या लोकलचं वैशिष्ट्य नसेल. तर मुंबईची पहिली एसी लोकल आमची मुंबई या थीमनुसार रंगवली जाणार आहे. या लोकलवर जाहिरातींऐवजी मुंबईच्या मानबिंदूंचं चित्र असेल. यात ऐतिहासिक ठिकाणं, पर्यटन स्थळं आणि इतर आकर्षणं रंगवली जाणार आहेत. एशियन पेंट्स कंपनीतर्फे सीएसआर प्रकल्पातून हे साध्य होणार आहे. एशियन पेंट्स आणि स्ट्रीट आर्ट इंडिया यांच्या समन्वयाने हा प्रकल्प मार्गी लागेल.
सुरूवातीच्या काळात एसी लोकलच्या सात फेऱ्या दिवसभरातून होतील. याचं भाडं साधारणतः फर्स्ट क्लासच्या तिकीट दरांएवढं असेल. मात्र एसी लोकलचं पास हा सध्याच्या फर्स्ट क्लास पासच्या दीडपट असण्याची शक्यता आहे. एसी लोकलची दारं स्वयंचलित असतील. त्याचं नियंत्रण मोटरमनकडे असेल. प्रत्येक स्टेशनवर एसी लोकल 20 ते 30 सेकंद थांबेल. एसी लोकलचा सर्वाधिक वेग 110 किमी प्रती तास असेल.
2012-13 च्या बजेटमध्ये पहिल्यांदा मुंबईत एसी लोकल धावण्याचं नमूद केलं गेलं. मात्र पहिला रेक दाखल झाला 2016 मध्ये.. त्यानंतर या लोकलच्या अनेक चाचण्या झाल्या. मात्र सॉफ्टवेअरच्या समस्येमुळे एसी लोकल कुर्ला कारशेडमध्ये उभीच होती. अखेर तिला पश्चिम रेल्वेकडे सुपूर्द करण्यात आलंय. आता 1 जानेवारीपासून एसी लोकल जीवाची मुंबई करायला मोकळी झालीय.