कोल्हापूर: गेल्या तीन दिवसात पावसामुळे पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. वाढलेल्या पाण्यामुळे कोल्हापुर जिल्ह्यातील नरसिंहवाडीतील दत्त मंदिरात पाणी शिरले आहे.नरसिंहवाडी येथे पंचगंगा आणि कृष्णा नदीचा संगम होतो. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून, पंचगंगा आणि कृष्णा ह्या दोन्ही ही नदी दुधडी भरून वाहत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार कायम आहे. त्यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी झपाट्याने  वाढत आहे. सकाळी आठ वाजता पंचगंगा नदीची पाणी पातळी ३६ फुट १ इंचावर पोहचली. पंचगंगा नदीची इशारा पातळी ३८ फुट इतकी आहे. जिल्ह्यातील सर्व नद्या दुथडी भरून वाहत असून अनेक नद्याचे पाणी पात्राबाहेर आले. त्यामुळे वाहतुकीचे अनेक मार्ग बंद झाले आहेत. 


आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार राधानगरी धरण ६७%, तुळशी धरण ६८%, वारणा धरण ७४% आणि दुधगंगा धरम 60 टक्के इतके भरले आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूर परिस्थितीमुळे नदीतील जलचर बाहेर येऊ लागल्याच्या घटनाही घडत आहेत. शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी गावात ११ फुटांची महाकाय मगर नदीतून बाहेर येऊन मानवी वस्तीत शिरली होती. नागरिकांनी आपातकालीन विभागाला माहिती दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी येऊन मगरीला पकडले. यानंतर मगरीला सुरक्षितस्थळी सोडून देण्यात आले.