पुणे: पुण्यात पाणीकपातीच्या निर्णयावरून महापालिका आणि कालवा समितीत समन्वय नसल्याचे समोर आले आहे. एकीकडे महापालिकेने पाणीकपातीचा निर्णय जाहीर केला असताना पालकमंत्री गिरीश बापट यांनी मात्र पाणीकपात होणार नसल्याचे 'झी २४ तास'शी बोलताना स्पष्ट केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यातील पाणीकपातीबाबत कालपासूनच गोंधळ सुरू आहे. मंत्रालयात झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला. मात्र, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी तुर्तास तरी पाणी कपातीचा निर्णय झालेला नसल्याचे गुरुवारी स्पष्ट केले.


यानंतर महापौर मुक्ता टिळक यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा १५ टक्के पाणीकपातीचा निर्णय घेणार असल्याचे सांगितले.  मात्र, मुक्ता टिळक या कालच्या बैठकीला नव्हत्या. त्यामुळे त्यांना निर्णयाबाबत कल्पना नसल्याचे अजब उत्तर बापट यांनी दिले. त्यामुळे महापालिका आणि राज्य सरकारमध्ये समन्वय नसल्याचे स्पष्ट दिसून आले. मात्र, या परस्परविरोधी वक्तव्यांमुळे पुणेकरांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.