सांगली: ओपिनियन आणि एक्झिट पोलचे सर्व अंदाज मोडून काढत राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा निवडणुकीत पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरेल, असा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. प्रचारादरम्यान शरद पवार यांच्या सभांना राज्यभरात मिळालेला प्रतिसाद पाहता हे मी खात्रीने सांगू शकतो, असे जयंत पाटील यांनी म्हटले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, गेल्या काही दिवसांत जाहीर झालेल्या मतदानपूर्व चाचण्या (ओपिनियन पोल) किंवा मतदानोत्तर चाचण्यांचे (एक्झिट पोल) निष्कर्ष पाहता 'दाल मे कुछ काला है', असे वाटत आहे. एक्झिट पोलच्या माध्यमातून एकच बाजू वरचढ आहे, ही गोष्ट लोकांच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न सुरु आहे. ओपिनियन पोल आणि एक्झिट पोलमधील निष्कर्ष हे एकतर्फी आहेत. 


एक्झिट पोल: पश्चिम महाराष्ट्रात पवार फॅक्टर निष्प्रभ; महायुतीचाच वरचष्मा


या सगळ्याच्या माध्यमातून कुठेतरी एकच बाजू निवडून येणार आणि तीदेखील मोठ्या संख्येने निवडून येईल, यासाठी लोकांची मने तयार केली जात आहेत. ही सगळी परिस्थिती पाहता संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर शंका घेण्यास वाव आहे. सत्तारुढ पक्षाने या शंकांचे निरसन केले पाहिजे. मात्र, निवडणूक आयोग वरून आदेश आल्यानंतर चाकरी करत असल्यासारखे वागतो, अशी टीका यावेळी जयंत पाटील यांनी केली.


तसेच महाराष्ट्रातील जनतेचा राष्ट्रवादी काँग्रेसला आतापर्यंत मिळालेला प्रतिसाद अत्यंत उत्तम होता. त्यामुळे राष्ट्रवादी राज्यातील पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरेल, असे जयंत पाटील यांनी सांगितले. 


तत्पूर्वी झी २४ तास आणि 'पोल डायरी' यांनी संयुक्तपणे केलेल्या सर्वेक्षणात भाजपला १२१-१२८, शिवसेना ५५ ते ६४, काँग्रेस ३९ ते ४६, राष्ट्रवादी काँग्रेस ३५ ते ४२, वंचित १ ते ४ आणि मनसेला १ ते ५ जागांवर विजय मिळवण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.