close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

एक्झिट पोल: पश्चिम महाराष्ट्रात पवार फॅक्टर निष्प्रभ; महायुतीचाच वरचष्मा

पश्चिम महाराष्ट्रात पवार फॅक्टर राजकीय समीकरणे बदलून ठेवेल, ही शक्यता सपशेल फोल ठरली आहे.

Updated: Oct 21, 2019, 08:17 PM IST
एक्झिट पोल: पश्चिम महाराष्ट्रात पवार फॅक्टर निष्प्रभ; महायुतीचाच वरचष्मा

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलेल्या झंझावाती प्रचारामुळे पश्चिम महाराष्ट्रात धक्कादायक निकाल पाहायला मिळतील, असा अंदाज राजकीय जाणकारांकडून व्यक्त केला जात होता. मात्र, सोमवारी मतदान संपल्यानंतर जाहीर झालेल्या 'झी २४ तास' आणि 'पोल डायरी'च्या एक्झिट पोलमध्ये पवार फॅक्टर निष्प्रभ ठरल्याचे दिसून आले. 'झी २४ तास' आणि 'पोल डायरी'च्या सर्वेक्षणात नगर जिल्हा वगळून पश्चिम महाराष्ट्रातील विधानसभेच्या ५८ जागांचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यामध्ये भाजपला २३ ते ३१, शिवसेनेला ५ ते ११, काँग्रेसला ७ ते १४, राष्ट्रवादीला १५ ते २१ आणि इतरांना २ ते ७ जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. 

त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात पवार फॅक्टर राजकीय समीकरणे बदलून ठेवेल, ही शक्यता सपशेल फोल ठरली आहे. राज्याच्या इतर भागांप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातही शिवसेनेला गतवेळच्या तुलनेत फटका बसण्याची शक्यता आहे. गेल्यावेळी शिवसेनेने कोल्हापूर जिल्ह्यात १० जागांवर विजय मिळवला होता. मात्र, यावेळी कोल्हापुरात काही ठिकाणी भाजपने जनसुराज्य पक्षाला छुपा पाठिंबा दिल्याने शिवसेनेला दगाफटका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेच्या जागांची संख्या ७ ते १४ पर्यंत मर्यादित राहील. 

एक्झिट पोल: शिवसेनेला मोठा धक्का; २०१४ पेक्षा कमी जागा मिळण्याची शक्यता

याशिवाय, सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघातही उदयनराजे भोसले यांनाच विजय मिळेल, असा अंदाज आहे. साताऱ्यात शरद पवार यांनी सभा घेतली होती. या सभेत त्यांनी भरपावसात केलेले भाषण चांगलेच गाजले होते. त्यामुळे सोशल मीडियावर राष्ट्रवादी काँग्रेसची चांगलीच हवा निर्माण झाली होती. याचे प्रतिबिंब मतदानात उमटण्याची शक्यता व्यक्ती केली जात होती. मात्र, एक्झिट पोलची आकडेवारी पाहिल्यास तसे घडताना दिसत नाही. जाणकरांच्या मते आधीपासून केलेली मोर्चेबांधणी भाजपसाठी फायदेशीर ठरली आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या सहकार चळवळीतील अनेक नेते भाजपमध्ये गेले आहेत. हा गट भाजपच्या पाठिशी उभा राहिल्याने पश्चिम महाराष्ट्रात महायुतीचे तितकेसे नुकसान न झाल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला आहे. 

विधानसभा निवडणूक २०१९ : 'झी २४ तास'चा 'एक्झिट पोल'