अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे: राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दररोज राज्याच्या वेगवेगळ्या भागांचे दौरे करत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र मातोश्रीवरून बाहेर पडायला तयार नाहीत, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. ते मंगळवारी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवले. चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की, फडणवीस रोज कुठे ना कुठे फिरताहेत. त्यांना काय कोरोनाची भीती नाही का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र बाहेर पडतच नाहीत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'पंढरपुरला जाऊन विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तीला स्पर्शही केला नाही; मुख्यमंत्री हिंदू आहेत ना?'


आतापर्यंत केवळ दोनवेळा ते मातोश्रीवरुन बाहेर पडले. कोणी मातोश्रीवर गेले तरी त्यांना मुख्यमंत्री त्यांना भेटायला तयार होत नाहीत. यापूर्वी २००४ साली शरद पवार मातोश्रीवर गेले होते. परंतु, गेल्या सहा महिन्यांत शरद पवार यांनी मातोश्रीवर तीन-चार फेऱ्या मारल्या आहेत. त्यांना इतक्या वेळा तिकडे जायला लागू नये असे, वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले. 


सरकारमध्ये तीन-चार मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे मातोश्रीच्या पिंजऱ्यात बंद- राणे


कालच भाजप नेते नारायण राणे यांनीदेखील याच मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले होते. उद्धव ठाकरे अनेक महिन्यांत मंत्रालयात फिरकलेले नाहीत. ते मातोश्रीच्या पिंजऱ्यात बंद आहेत. त्यामुळे सरकारी अधिकाऱ्यांवर वचक राहिलेला नाही. उद्धव ठाकरे यांच्या या निष्क्रिय कारभारामुळे राज्याचे नुकसान होत असल्याची टीका नारायण राणे यांनी केली होती. एकूणच भाजपच्या नेत्यांनी आता हा मुद्दा उचलून धरल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता शिवसेनेच्या गोटातून या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 

दरम्यान, आजच्या पत्रकारपरिषदेत चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील हातावर पोट असलेल्या लोकांना एका महिन्यासाठी नोकरी देणार असल्याचे जाहीर केले. तसेच यापुढील काळात लॉकडाऊन झेपणार नाही, असे मतही चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.