मुंबई : मुख्यमंत्र्यांनी यंदाच्या वर्षी आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढपूरात जाऊन वारकरी संप्रदायाचा अवमान केल्याची टीका भाजप नेते नारायण राणे यांनी केली. पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी सुरुवातीपासूनच uddhav thackeray उद्धव ठाकरे आणि महाविकासआघाडी सरकारवर जळजळीत शब्दांत टीका केल्याचं पाहायला मिळालं.
कोरोना व्हायरस आणि त्यामुळं निर्माण झालेल्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी आषाढीच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या शासकीय महापूजेवरही याचं सावट पाहायला मिळालं. खुद्द पंढरपूरातील स्थानिकांनाही या दिवशी मंदिरप्रवेश नाकारण्यात आला. यावरच टीका करत राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकेची झोड उठवली.
'मुख्यमंत्री पंढरपूरात गेले. शासकीय महापूजेचा मान असतो त्यांचा. पण, यांनी काय केलं, दर्शन घेतलं का? विठ्ठलाच्या मूर्तीच्या पायांना हात लावला का? गंध लावलं, हार घातला का? नैवेद्य घेतला का, हा तर वारकरी संप्रदायाचा अपमान आहे. हे मुख्यमंत्री आहेत ना, हिंदू आहेत ना?', या शब्दांत राणेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
पंढरपूरातील एकाही व्यक्तीला मंदिरात जाऊ दिल्ं नाही, एकाही स्थानिक शिवसैनिकाला ते भेटले नाहीत ही बाब अधोरेखित करत, पिंजऱ्यातच करायची होती तर मग मातोश्रीवरच विठ्ठलाच्या मूर्तीची पूजा करायची होती असा टोला त्यांनी लगावला. यावेळी त्यांनी मंदिरात गरम होतं म्हणून कारमध्ये येऊन बसणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव, राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे तर, चार पावलं पुढे असल्याचं म्हणत त्यांनाही खडे बोल सुनावले.
मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाच्या पूजेलाच महत्त्वं दिलं नसल्याचं म्हणच आता जनतेच्या प्रश्नाला वाली राहिलेला नाही असा ऩाराजीचा सूर राणेंनी आळवला. राणेंच्या या टीकेला आता शिवसेना आणि सत्ताधारी महाविकास आघाडीकडून नेमकं काय उत्तर दिलं जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.