26/11 दहशतवादी हल्ल्याच्या मास्टरमाइंड हाफिज सईदचा सहकारी ठार? कराचीमध्ये गोळ्या घालून हत्या
पाकिस्तानमधील कराचीमध्ये लष्कर-ए-तोयबामधील एका दहशतवाद्याला ठार करण्यात आलं आहे. मुफ्ती कैसर फारुख असं या दहशतवाद्याचं नाव असून, तो मुंबई 26-11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचा सहकारी असल्याचा दावा केला जात आहे.
पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबामधील एका मोठ्या दहशतवाद्याची हत्या करण्यात आली आहे. मुफ्ती कैसर फारुख असं या दहशतवाद्याचं नाव असून कराचीत त्याला ठार करण्यात आलं असल्याचं वृत्त स्थानिक वृत्तवाहिन्यांनी दिलं आहे. अज्ञातांनी ही हत्या केल्याचं सांगितलं जात आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचा तो जवळचा सहकारी होता असं सांगितलं जात आहे. लष्कर-ए-तोयबा दहशतवादी संघटनेची स्थापना करण्यात त्याचाही हात होता अशी माहिती आहे.
पाकिस्तानमधील डॉन वृत्तपत्राने पोलीस सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, काही शस्त्रधारी हल्लेखोरांनी ईजी सेंटरजवळ गुलशन-ए-उमर मदरशात 30 वर्षीय कैसर फारुख आणि 10 वर्षीय शाकीर यांना गोळी घालून जखमी केलं व फरार झाले. समानाबाद पोलीस ठाण्याचे प्रभारी इरशाद अहमद सूमरो यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींना अब्बारी शहीद रुग्णालयात नेण्यात आलं होतं. तिथे उपचार सुरु असताना फारुखचा मृत्यू झाला. कैसरच्या पाठीवर गोळी लागली होती. तर शाकिरच्या चेहऱ्यावर गोळी लागली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी शाकीर हा मदरशाचा विद्यार्थी होता. कैसरची गोळ्या घालून हत्या करण्यात आली तेव्हा तो समानाबादमधील त्या परिसरातून निघाला होता. सेंट्रल एसएसपी फैसल अब्दुल्ला चाचर यांनी सांगितलं आहे की, ही एक टार्गेट हत्या होती. कारण हत्या केल्यानंतर त्यांच्याकडून काहीच लुटण्यात आलं नाही.
सोशल मीडियावर कथित व्हिडीओ व्हायरल
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीआ याच हत्येचा असल्याचा दावा केला जात आहे. या व्हिडीओची पुष्टी झालेली नाही. दरम्यान, व्हिडीओत दिसत आहे की फारुख काही लोकांसह चालत असताना अचानक गोळीबार सुरु होती. यानंतर जवळ उभे असणारे लोक सैरावैरा पळू लागतात. यादरम्यान गोळी लागल्याने एक व्यक्ती खाली जमिनीवर कोसळतो. दरम्यान, अद्याप जो ठार झाला आहे तो भारताच्या मोस्ट वॉण्टेड दहशतवाद्यापैकी आहे याची खात्री झालेली नाही. सोशल मीडियावरुन हा दहशतवादी कैसर फारुख आहे असा दावा केला जात आहे.
दरम्यान अशाच प्रकारची आणखी एक घटना पाकिस्तानच्या गुलशन-ए-हदीदमध्ये घडली आहे. येथे शत्रुत्वातून दोन लोकांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन शस्त्रधारी शाहबाज पेट्रोल पंपाजवळील एस्टेट एजन्सीत पोहोचले होते. यावेळी एकजण दुचाकीवरुन उतरला आणि दुसरा तिथेच थांबला. शस्त्रधारी व्यक्तीने एजन्सीत प्रवेश केल्यानंतर 65 वर्षीय जवार हुसैनशी हात मिळवला आणि नंतर अंदाधुंद गोळीबार सुरु केला. तर दुसऱ्या व्यक्तीने 68 वर्षीय अतहर जोखिया यांना गोळ्या घातल्या.