बांगलादेशच्या प्रवासी विमानाला अपघात
बांगलादेशच्या प्रवासी विमानाला नेपाळमध्ये अपघात झाला आहे. नेपाळमधील काठमांडू विमानतळाजवळ हा अपघात झाल्याचं वृत्त समोर येत आहे.
नवी दिल्ली : बांगलादेशच्या प्रवासी विमानाला नेपाळमध्ये अपघात झाला आहे. नेपाळमधील काठमांडू विमानतळाजवळ हा अपघात झाल्याचं वृत्त समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यूएस-बांग्ला एअरलाईन्सचं हे विमान होतं. बांगलादेशहून कांठमांडूकडे हे विमान निघालं होतं. मात्र, काठमांडू विमानतळावर लँड होण्यापूर्वीच विमानाला अपघात झाला आहे.
प्राथमिक माहितीनुसार विमानात ७८ प्रवासी होते आणि त्यासोबतच क्रू मेंबर्स आणि फायर फायटर्सही विमानात होते. आतापर्यंत २८ प्रवाशांचा मृत्यू झालाय तर अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.
लँड करताना झाला अपघात
नेपाळमधील स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, अपघात झालेलं विमान S2-AGU, बॉम्बार्डियर डैश 8 Q400 आहे. मात्र, यासंदर्भात अद्याप कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाहीये. दुपारी २ वाजून २० मिनिटांच्या सुमारास हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे.
नेपाळमधील स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, विमानाचा अपघात झाल्यानंतर तात्काळ विमानतळावरील उड्डाण बंद करण्यात आलं आहे.