Gold missing from Nepal Pashupatinath temple: पर्यटक आणि स्थानिक नागरिकांसाठी प्रमुख आकर्षणाचं केंद्र आणि श्रद्धास्थान असणाऱ्या नेपाळच्या पशुपतीनाथ मंदिरातून तब्बल 10 किलो सोनं लांबवल्याची माहिती समोर आली आणि एकच खळबळ माजली. मंदिरातून सोनं अचानकच गायब झाल्याचं कळताच तातडीनं सदरील प्रकरणाचा तपास सुरु झाला. ज्यानंतर लगेचच भ्रष्टाचार विरोधी तपास यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत मंदिराचा ताबा घेतला आणि तपास सुरु केला. सीआयएएनं मंदिराचा ताबा घेतल्यामुळं सध्या इथं येणाऱ्या भाविकांनाही प्रवेश नाकारला जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेपाळमधील सर्वात जुन्या मंदिरांच्या यादीत अग्रस्थानी येणाऱ्या पशुपतीनाथ मंदिरातून 100 किलोंपैकी 10 किलो सोनं गायब झाल्यामुळं संसदेत अनेक प्रश्न उपस्थित झाले. ज्यानंतर सीआयएच्या ताब्यात तपासाची सूत्र सोपवण्यात आली. सीआयएए ही नेपाळ सरकारची भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवणारी एक घटनात्मक यंत्रणा असल्याचं सांगितलं जात आहे. 


दरम्यान, मंदिर संस्थानच्या माहितीनुसार जलाहारीच्या निर्माणासाठी मंदिराकडून तब्बल 103 किलो सोनं खरेदी करण्यात आलं होतं. पण, आभूषणांमधून 10 किलो सोनं गायब असल्याची बाब लक्षात आली. पशुपती क्षेत्र विकास ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष घनश्याम खातीवाडा यांनी माघ्यमांशी संवाद साधताना दिलेल्या माहितीनुसार सोन्याबाबतचे प्रश्न उपस्थित झाल्यानंतर तयार करण्यात आलेल्या जलाहारीचीही पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. 


पशुपतीनाथ मंदिराचं महत्त्वं 


नेपाळमध्ये पशुपतीनाथ मंदिर हे सर्व मंदिरांमध्ये अग्रस्थानी मांडलं जातं. पशुपतीनाथ या शब्दाची फोड केल्यास पशु म्हणजे 'जीवन' आणि पती म्हणजे 'स्वामी' थोडक्यात पशुपतीनाथ म्हणजे जीवनाची देवता असा अर्थ होतो. पशुपतीनाथ हे चार चेहरे असणारं लिंग आहे. याच्या पूर्वेकडील चेहऱ्याला तत्पुरुष आणि पश्चिमेकडील मुखाला सद्ज्योत असं म्हणतात. उत्तरेकडील चेहऱ्याला वामवेद आणि दक्षिणेकडील चेहऱ्याला अघोरी म्हणून संबोधतात.