France Riots : गेल्या पाच दिवसांपासून फ्रान्समध्ये (France) सतत हिंसाचार सुरू आहे. सर्व प्रयत्न करूनही परिस्थिती सुधारण्याचे नाव घेत नाही. फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये एका किशोरवयीन तरुणाची पोलिसांनी (France Police) गोळ्या झाडून हत्या केल्याच्या घटनेनंतर देशभरात मोठ्या प्रमाणात निदर्शने सुरू आहेत. आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात जाळपोळ करत फ्रान्समध्ये दंगली घडवल्या आहेत. आंदोलकांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्या आणि पाण्याच्या वापर केला जात आहे. या आंदोलनातून 875 जणांना अटक करण्यात आली असून या संघर्षात 200 पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फ्रान्समधील या गंभीर परिस्थितीमध्ये युरोपियन डॉक्टर आणि प्रोफेसर एन जॉन कॅम यांनी भारताकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना दंगलीची परिस्थिती हाताळण्यासाठी पाठवण्याची मागणी केली आहे. 'फ्रान्समधील दंगलीची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी भारताने योगी आदित्यनाथ यांना पाठवले पाहिजे, ते 24 तासांत सर्व काही ठीक करतील, असे प्रोफेसर एन जॉन कॅम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.


या ट्विटमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही टॅग करण्यात आले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या फेक प्रोफाईलच्या ट्विटला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयानेही उत्तर दिले आहे. जेव्हा जेव्हा जगाच्या कोणत्याही भागात दंगल उसळते, कायदा आणि सुव्यवस्था बिघडते तेव्हा जग योगी मॉडेलची मागणी करते. या मॉडेलच्या आधारे मुख्यमंत्र्यांनी उत्तर प्रदेशात कायदा व सुव्यवस्था बहाल केली आहे, असे सीएमओ कार्यालयाने म्हटलं आहे.



दुसरीकडे, फ्रान्समध्ये परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तिथे योगी मॉडेल राबवण्याची मागणी जोर धरू लागल्यानंतर वेगळीच शंका निर्माण केली जात आहे. ही मागणी करणाऱ्या व्यक्तीबाबत योग्य माहिती उपलब्ध नसल्याने त्याची ही कृती संशयास्पद वाटत आहे. प्रोफेसर एन जॉन कॅम नावाची ही व्यक्ती स्वत:ला अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टीमधली तज्ज्ञ असल्याचे सांगत आहे. पण प्रत्यक्षात त्याचे नाव काही वेगळेच आहे. सोशल मीडियावरील अनेक युजर्सनी दावा केला की, हे प्रोफाईल खरे तर डॉ नरेंद्र विक्रमादित्य यादव नावाच्या व्यक्तीचे आहे. फसवणूक प्रकरणी या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.


योगी मॉडेल काय आहे?


गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी खूप कडक कारवाई करण्यात येत आहे. दंगल किंवा अन्य कोणताही गुन्हा करणाऱ्यांच्या घरावर बुलडोझर चालवला जातो. याला योगी मॉडेल म्हटले जात आहे. भारतातही विविध राज्यांमध्ये हे मॉडेल स्वीकारण्याची चर्चा आहे. त्याचबरोबर मध्य प्रदेशसह काही राज्यांमध्येही याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. याठिकाणी कोणत्याही प्रकारचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांच्या घरांवर बुलडोझर टाकण्यात आला आहे. अतिक अहमद सारख्या माफियांनी बळकावलेल्या जमिनीवर बुलडोझर फिरवून तिथे बांधलेल्या अपार्टमेंटमध्ये लोक स्थायिक झाले आहेत.


दरम्यान, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी शुक्रवारी पालकांना त्यांच्या मुलांना घरी थांबवण्याचे आवाहन केले आहे. तसेच फ्रान्समध्ये पसरणाऱ्या दंगलींना रोखण्यासाठी सोशल मीडियावर बंदी घालण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. स्नॅपचॅट आणि टिकटॉकसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने या आठवड्यात हिंसाचाराला चालना देण्यात भूमिका बजावली आहे, असे मॅक्रॉन यांनी म्हटलं आहे.