Diwali : फक्त भारतातच नाही तर या देशातही दिली जाते दिवाळीची अधिकृत सुट्टी
दिवाळी हा सण फक्त भारतातच साजरा केला जातो असं नाही. इतर देशांमध्ये ही दिवाळी जोरात साजरी होते.
Diwali Holiday : दिवाळी हा भारतातला सर्वात मोठा सण आहे. पण हा सण फक्त भारतातच नाही तर परदेशातही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटले की, फक्त भारतातच नाही तर इतर काही देशांमध्ये देखील दिवाळीची अधिकृत सुट्टी दिली जाते.
नेपाळ, भूतान, मॉरिशस, मलेशिया, सिंगापूरसह अनेक आफ्रिकन देश आहेत, जे दिवाळी साजरी करण्यासाठी नागरिकांना अधिकृतपणे सुट्टी देतात. या देशांमध्ये देखील दिवाळी हा सण राष्ट्रीय सुट्टी म्हणून घोषित केला आहे. चला जाणून घेऊया, कोणते देश आहेत, ज्यांनी आपल्या देशातील नागरिकांना दिवाळीला अधिकृत सुट्टी दिली आहे.
अमेरिका : न्यूयॉर्कमध्येही दिवाळीची सुट्टी असते. न्यूयॉर्कचे महापौर एरिक अॅडम्स यांनी स्वतः याची घोषणा केली आहे. तसेच येथील लोक दिवाळी उत्साहात साजरी करतात. न्यूयॉर्कचा टाइम्स स्क्वेअर अतिशय भव्य पद्धतीने सजवण्यात आला आहे.
मॉरिशस : या देशात हिंदूंची लोकसंख्या 80 टक्के आहे. येथे सरकारने दिवाळीला अधिकृत सुट्टी जाहीर केली आहे. देशभरात दिवाळी साजरी केली जाते.
मलेशिया : या देशात ही मोठ्या संख्येने हिंदू राहतात. येथे दिवाळी हरी दिवाळी म्हणून लोकप्रिय आहे. लोक सुगंधी तेल आणि अत्तर लावून आंघोळ करतात. सरकारने दिवाळी ही राष्ट्रीय सुट्टी म्हणून घोषित केली आहे.
सिंगापूर : सरकारने दिवाळीच्या दिवशी सुट्टी जाहीर केली आहे. रात्री लोक घर सजवतात आणि संपूर्ण शहर आणि बाजारपेठ दिव्यांनी उजळून निघते. लोक पूजा करतात आणि फटाके फोडतात.
श्रीलंका : येथील सरकारने दिवाळीला अधिकृत सुट्टी जाहीर केली आहे. येथे तमिळ समाजातील लोक हा सण मोठ्या आनंदाने आणि जल्लोषात साजरा करतात.
नेपाळ : नेपाळमध्येही दिवाळी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते आणि येथे हा पाच दिवसांचा सण आहे. येथे सरकारने अधिकृत सुट्टी जाहीर केली आहे. त्याला तिहार असेही म्हणतात. यामध्ये लक्ष्मी देवीसोबत गाय, कुत्रे, कावळे यांचीही पूजा केली जाते.
फिजी : फिजीत मोठ्या संख्येने हिंदू कुटुंबे राहतात. एवढेच नाही तर येथे मोठ्या संख्येने लोक हिंदी भाषेत बोलतात. दिवाळीच्या दिवशी या ठिकाणचे सौंदर्य पाहण्यासारखे असते. हा दिवस सरकारने अधिकृत सुट्टी म्हणून घोषित केला आहे.
त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये सरकारने दिवाळीची अधिकृत सुट्टी जाहीर केली आहे. येथे मोठ्या संख्येने हिंदू लोक राहतात, त्यामुळे दिवाळीला येथे खूप धमाल पाहायला मिळते.