इस्लामाबाद : पाकिस्तानात इम्रान खान सरकारवर संकटाचं वादळ घोंघावू लागलंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान सेनेचे प्रमुख जनरल बाजवा यांच्या आदेशानंतर १११ ब्रिगेडच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्यात. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, इतिहासात डोकावलं तर १११ ब्रिगेडचा वापर नेहमी सत्ताबदलासाठी केला गेलाय. जनरल बाजवा यांनी पाकिस्तानच्या व्यापाऱ्यांसोबत गुप्त बैठक केल्याचीही सूत्रांची माहिती आहे. हे दोन्ही घटनाक्रम पाहता पाकिस्तानात लवकरच सत्ताबदलाचे संकेत मिळत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्व सैनिकांना गुरुवारी सायंकाळपर्यंत ड्युटीवर परतण्याचे आदेश देण्यात आलेत. पाकिस्तान सेनेची १११ ब्रिगेड रावळपिंडीमध्ये तैनात असते. ही पाकिस्तान सेनेच्या हेडक्वार्टरची 'गॅरिसन ब्रिगेड' आहे. या ब्रिगेडचा वापर यापूर्वी जवळपास प्रत्ये सैन्य सत्ताबदलात करण्यात आलाय. त्यामुळेच या ब्रिगेडला 'तख्तपालट ब्रिगेड'ही म्हटलं जातं.


इम्रान खान यांना पाकिस्तानी सेनेकडूनच गादीवर बसवण्यात आलंय. परंतु, सध्या मात्र त्यांनी पाकिस्तानी सेना त्यांच्यावर नाराज आहे. 



भारतात जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर इम्रान खान यांनी ज्यापद्धतीनं हा मुद्दा हाताळला त्यावर पाकिस्तानी सैन्य नाखुश आहे. संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानची बाजू मांडण्यात इम्रान खान अपयशी ठरल्याचंही चित्र दिसतंय. त्यामुळेच पाकिस्तानी सेना पुन्हा एकदा देशाची सत्ता आपल्या हातात घेण्याची चिन्हं आहेत.