एकटं वाटतंय? आता, `मित्र`ही घ्या भाड्यानं...
`जगात नातीगोती, मित्र विकत मिळत नाहीत` ही म्हण आता खोटी ठरतेय
टोकियो : धकाधकीच्या जिवनात माणसाला ना मित्र राहिले ना नातीगोती.... घड्याळाच्या काट्य़ासोबत धावणाऱ्या लोकांना आता एकलकोंडेपणाचा सामना करावा लागतोय. त्यामुळंच एका कंपनीनं आता चक्क भाड्यानं मित्र द्यायला सुरुवात केलीय. 'जगात नातीगोती, मित्र विकत मिळत नाहीत' अशी म्हण आहे. ही म्हण आता इतिहासजमा झालीय. कारण जपानमध्ये चक्क मित्र भाड्यानं मिळतात.
जपानमधील 'रिअल अपील' नावाची कंपनी भाड्यानं मित्र पुरवण्याचं काम करते. तुम्हाला पाहिजे तेवढे मित्र मिळतील फक्त त्यासाठी तुमची पैसे मोजण्याची तयारी हवी.
पैसे मोजा आणि मित्र घरपोच मिळतील. या भाडोत्री मित्रांच्या येण्या-जाण्याचा खर्च तुम्हाला करावा लागतो. शिवाय चांगला ग्रुप फोटो हवा असेल तर त्यांची बडदास्तही ठेवावी लागते. दोन तासाचे पाच हजार रुपये हे मित्र घेतात.
अमेरिका आणि युरोपातल्या काही कंपन्या भाड्याने आई-वडीलही देऊ लागलेत. या कंपन्यांच्या मते भाड्यानं आणलेली आई तुमच्या मनाप्रमाणे वागते. शिवाय ती प्रेमळही असते. व्हॅर्च्युअल जमान्यात आता व्हॅर्च्युअल नातीही उपलब्ध होऊ लागली आहेत. नाती-गोती विकत घेण्याची पाळी माणसावर आल्यानं धावपळीच्या युगात माणूस किती एकटा पडलाय, हे यानिमित्तानं अधोरेखित झालंय.