फरारी मुस्लीम धर्मप्रचारक झाकीर नाईक ((Hate Preacher Zakir Naik)) जो आपल्या भाषणांमधून द्वेष पसरवत असतो त्याचा पाकिस्तान दौऱ्यादरम्यान एका अनाथाश्रमात केलेले धक्कादायक वर्तन सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या कार्यक्रमातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पाकिस्तानस्थित संशोधक आणि पत्रकार उस्मान चौधरी यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, झाकीर नाईक मंचावर उपस्थित असताना अनाथाश्रमाचा एक अधिकारी स्वागत स्मृतीचिन्ह देण्याच्या तयारीत होता. यावेळी मंचावर उपस्थित अनाथ त्याला अभिवादन करत होत्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंचावर एकीकडे झाकीर नाईकला स्मृतीचिन्ह देण्याची तयारी सुरु असतानाच तो घाईत निघून जाताना दिसत आहे. यावेळी उपस्थित मुलींनाही नेमकं काय झालं ते समजत नाही. झाकीर नाईकला राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) फरार जाहीर केलं आहे. 


यूकेमधील प्रभावशाली सोशल मीडिया युजर इम्तियाज महमूद यांनी एका पोस्टमध्ये म्हटलं आहे की, अनाथाश्रमाच्या अधिका-यांनी मुलींची ओळख "मुली" म्हणून केल्यामुळे झाकीर नाईक रागावला. "तुम्ही त्यांना स्पर्श करू शकत नाही किंवा त्यांना तुमच्या मुली म्हणू शकत नाही," असं झाकीर नाईक बोलतो. यावेळी तो मुलींना "गैर-बेहरम" म्हणून संबोधित करतो.


झाकीर नाईकच्या या प्रतिक्रियेमागील कारण स्पष्ट करताना इम्तियाज महमूद म्हणाले की, त्याचा युक्तिवाद असा आहे की या लहान मुली लग्नाच्या वयाच्या आहेत, ज्यामुळे त्यांची ओळख त्याच्या 'मुली' म्हणून करता येत नाही.


इस्लामिक भाषेत, "हरम" चा अर्थ पवित्र किंवा निषिद्ध असा आहे, तर "महरम" म्हणजे ज्या व्यक्तीशी लग्न करता येत नाही अशा व्यक्तीला संदर्भित केले जाते - उदाहरणार्थ, वडील आणि मुलगी.  "गैर-बेहरम" म्हणजे फक्त अशा व्यक्तीचा संदर्भ आहे जिच्याशी कोणी लग्न करू शकते किंवा त्या व्यक्तीशी लग्न करणे "हराम" नाही.


झाकीर नाईकने गुरुवारी पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांची भेट घेतली. पाकिस्तान सरकारच्या निमंत्रणावरून झाकीर नाईक सोमवारी पाकिस्तानात आला. या पार्श्वभूमीवर इस्लामाबाद, कराची आणि लाहोरमध्ये कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली होती. भारताने झाकीर नाईकच्या पाकिस्तान दौऱ्याचा निषेध केला आहे. 


भारत सरकारच्या प्रवक्त्याने सांगितले की, "भारतीय कायद्यापासून पळ काढलेल्या व्यक्तीचे पाकिस्तानमध्ये उच्चस्तरीय स्वागत झाले आहे याचं आम्हाला आश्चर्य वाटत नाही. हे निराशाजनक आणि निषेधार्ह आहे, परंतु आश्चर्यकारक नाही". भारतातून पळून गेल्यापासून तो मलेशियामध्ये राहत होता. 20 ऑगस्ट रोजी मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी त्यांच्या भारत दौऱ्यात सांगितले की झाकीर नाईकच्या विरोधात पुरेसे पुरावे सादर केले गेले तर मलेशिया दहशतवादाला माफ करणार नाही.