द हेग - पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी भारतीय लष्करावर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कुलभूषण जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयात दोन्ही देशांचे दिग्गज वकील आपापली बाजू मांडणार आहेत. या प्रकरणात आजपासून चार दिवस सलग सुनावणी होते आहे. पाकिस्तानात हेरगिरी केल्याच्या आरोपावरून तेथील लष्करी न्यायालयाने भारतीय नागरिक असलेल्या कुलभूषण जाधव यांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली. भारताने तातडीने या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयात आव्हान दिले. पाकिस्तानकडून कुलभूषण जाधव यांचे अपहरण करण्यात आले आहे. ते गुप्तहेर नाहीत, असा युक्तिवाद भारताचा आहे. कुलभूषण जाधव हे भारतीय नौदलातून निवृत्त झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एप्रिल २०१७ मध्ये पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना शिक्षा सुनावल्यानंतर लगेचच मे २०१७ मध्ये भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. त्यानंतर १८ मे २०१७ रोजी या खटल्याचा निकाल देत नाही, तोपर्यंत कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेची अंमलबजावणी करू नये, असे आदेश १० न्यायाधीशांच्या पीठाने पाकिस्तानला दिले. पाकिस्तानकडून व्हिएन्ना कराराचे उल्लंघन झाले आहे. भारताच्या उच्चायुक्तांना जाधव यांना भेटण्यास परवानगी दिली जात नाही, असेही भारताने न्यायालयात म्हटले आहे. कुलभूषण जाधव यांची तातडीने सुटका करावी, अशी मागणी भारताने न्यायालयात केली आहे. 


आजपासून गुरुवारपर्यंत या प्रकरणी हेगमध्ये या खटल्याची सुनावणी होणार आहे. या प्रकरणात भारताची बाजू ज्येष्ठ वकील हरिष साळवे मांडणार आहेत. पाकिस्तानची बाजू मांडण्यासाठी खवर कुरेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.