`प्राईज टॅग`मुळे ब्रिटिश राजघराण्याच्या धाकट्या सूनबाईंवर `ट्रोल`धाड
लग्न झाल्यापासून मेगन अनेकदा ट्रोल झालीय
नवी दिल्ली : पूर्वाश्रमीची हॉलीवूड अभिनेत्री मेगन मर्केल ब्रिटीश राजघराण्याची सून काय झाली... तिचं सोशल मीडियावर होणारं ट्रोलिंग वाढतंच चाललंय. सध्या तीन देशांच्या दौऱ्यावर असणाऱ्या राजघराण्याच्या धाकट्या सूनबाईंचा वेंधळेपणा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलाय.
ब्रिटीश राजघराण्याची धाकटी सून डचेस ऑफ ससेक्स मेगन मर्केल पुन्हा एकदा ट्रोल झालीय. प्रिन्स हॅरी आणि मेगन सध्या तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत. लग्न झाल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच मोठा दौरा... ऑस्ट्रेलियाचा दौरा आटोपून प्रिन्स हॅरी व मेगन गुरुवारी फिजीच्या टोंगा शहरात पोहचले.
स्टिलेटो हिल्स, काळ्या रंगाच्या क्लचसह डार्क लाल रंगाचा सुंदर ड्रेस परिधान करुन मेगन चार्टर्ड प्लेनमधून खाली उतरली... आणि सर्वांच्या नजरेस पडला तो ड्रेसवरचा प्राईस टॅग... मेगनच्या पायाजवळ असलेला हा टॅग स्पष्टपणे दिसत होता. मेगनला ड्रेस परत करायचा असेल बहुतेक, असं म्हणून काहींनी ट्रोल केलं तर तिच्या सौंदर्याचं कौतुक करत काहींनी त्याकडे दुर्लक्ष केलं. मात्र हॅरी मेगनचा हा दौरा चर्चेत राहिला तो प्राईस टॅगमुळे...
ब्रिटीश राजघराण्याची सून झाल्यापासून मेगनच्या वागण्या बोलण्यापासून ते तिच्या पेहरावाकडे साऱ्या जगाचं बारीक लक्ष असतं. अर्थात लग्न झाल्यापासून मेगन अनेकदा ट्रोल झालीय.
दिवंगत प्रिन्सेस डायनाच्या भाचीच्या लग्नात घातलेल्या ऩिळ्या पांढऱ्या रंगाच्या ढगळ मॅक्सी ड्रेसमुळे मेगन ट्रोल झाली.
त्यानंतर रॉयल एअर फोर्सच्या १०० व्या वर्धापन दिन कार्यक्रमात मेगनने घातलेल्या काळ्या रंगाच्या ड्रेसवर जोरदार टीका झाली. सप्टेंबर महिन्यात मेगन पुन्हा चर्चेत आली.
लंडनमधल्या रॉयल अकॅडमी ऑफ आर्ट्सचा एका प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी मेगन येणार होती. मेगन आलिशान कारमधून उतरली आणि गाडीतून उतरल्यानंतर गाडीचा दरवाजा तिने स्वत:च बंद केला. मेगन पुन्हा ट्रोल झाली.
राजशिष्टाचारामुळे नेटकऱ्यांना थेट उत्तरं देण्याची तिला आता परवानगी नाही. तरीही आब राखून कृतीतून ती आत्मविश्वासाने उत्तर देतेय, हे अनेकांना एव्हाना समजलं असेलही...