पाकिस्तानात दहशतवादाची `पाठशाळा`; ते 100 काश्मिरी तरुण गेले कुठे?
काय आहे हा नेमका प्रकार?
मुंबई : काश्मिरी तरुणांचा ब्रेन वॉश करून पाकिस्तान त्यांना कसं दहशतवादी बनवतंय..? भारतात घातपाती कारवाया घडवण्यासाठी या तरुणांचा कसा गैरवापर केला जातोय.? ते 100 काश्मिरी तरुण गेले कुठे? पाकिस्तानात गेलेले काश्मिरी तरुण 'गायब' झाले आहेत. पाकिस्तानात दहशतवादाची 'पाठशाळा' सुरू आहे का? असा देखील सवाल निर्माण होत आहे.
भारतातून अनेकजण अधिकृत व्हिसा काढून पाकिस्तानात आणि काश्मिरीमध्ये तरुण जातात. मात्र गेल्या तीन वर्षांत अशाप्रकारे पाकिस्तानात गेलेले सुमारे 100 काश्मिरी तरुण अद्याप परतलेलेच नाहीत तर ते गायब झालेत. त्यांचा नेमका अतापता सापडत नाही आहे.
त्यांना शोधण्यासाठी सुरक्षा यंत्रणा जंग जंग पछाडत आहेत. मात्र अजून त्यांचा सुगावा लागलेला नाही. यापैकी अनेकांचा ब्रेन वॉश करून त्यांना दहशतवादी बनवलं असावं, अशी भीती व्यक्त केली जातेय.. तर काहीजण पाकिस्तानात दहशतदाचं ट्रेनिंग घेऊन स्लीपर सेल म्हणून पुन्हा भारतात परतले असावेत, अशीही शक्यता आहे. मात्र ते परत आल्याची कोणतीही अधिकृत नोंद सरकारी यंत्रणांकडे नाही.
अधिकृत व्हिसा काढून पाकिस्तानात जाणाऱ्यांवर प्रतिबंध घालणं शक्य नाही... मात्र पाकिस्तानातून परतलेल्या अशा काश्मिरी तरुणांच्या हालचालींवर सुरक्षा यंत्रणा बारीक लक्ष ठेवतात. संशयास्पद हालचाली नसल्यास अशा तरुणांवरील लक्ष काढून घेतलं जातं... मात्र जे परत येतच नाहीत, त्यांचं काय करायचं, असा प्रश्न सुरक्षा यंत्रणांना पडला आहे.