नवी दिल्ली : भारतात यशस्वी हार्ट सर्जरी करून पाकिस्तानात परतलेल्या चार महिन्यांच्या चिमुरड्याचा मृत्यू झालाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानात परतल्यानंतर डिहायड्रेशनचं निमित्त झालं आणि या चिमुरड्यानं प्राण सोडले. या मृत बाळाचं नाव रोहान सादिक आहे. रोहानचे वडील कंवल सिद्दीकी यांनी ट्विटरवरून ही माहिती दिलीय. 


१२ जून रोजी नोएडाच्या जे पी हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आल्यानंतर, १४ जून रोजी रोहानवर शस्त्रक्रिया पार पडली होती. त्यानंतर रोहान जवळपास महिनाभर भारतातच डॉक्टरांच्या देखरेखीखाली होता. त्यानंतर आपल्या आई-वडिलांसोबत तो पाकिस्तानात परतला होता.


रोहानला मेडिकल व्हिजा मिळवून देण्यासाठी खुद्दा भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मदत केली होती. रोहानच्या मृत्यूनंतर त्याच्या वडिलांनी पुन्हा एकदा भारतीयांचे आभार मानलेत. 'माझा रोहान रात्री या जगातून निघून गेला... तो हृदयाच्या आजाराशी यशस्वीरित्या लढला आणि जिंकलाही... पण, डिहायड्रेशनमुळे आज त्यानं या जगाचा निरोप घेतलाय' असं त्याच्या वडिलांनी ट्विटरवर म्हटलंय.


सुषमा स्वराज यांची मदत


३२ वर्षीय कंवल सिद्दीकी पाकिस्तानातील लाहौरमध्ये राहतात. आपल्या मुलाच्या उपचारासाठी ते अनेक दिवस भारतात येण्याचा प्रयत्न करत होते. परंतु, दोन्ही देशांचे संबंध बिघडले असल्यानं त्यांचा व्हिजा मंजूर होत नव्हता. त्यानंतर त्यांनी ट्विटरवरून परदेशमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे मदतीची याचना केली. सुषमा स्वराज यांच्या हस्तक्षेपानंतर रोहान आणि त्याच्या पालकांना भारतात येण्यासाठी मेडिकल व्हिजा मिळाला होता.  


रोहानच्या मृत्यूनंतर दोन्ही देशांतील नागरिकांनी हळहळ व्यक्त केलीय.