समझौता एक्सप्रेस कायमची बंद, पाकिस्तानी रेल्वेमंत्र्यांची घोषणा
जेव्हापर्यंत मी पाकिस्तानचा रेल्वेमंत्री असेल तेव्हापर्यंत समझौता एक्सप्रेस चालू देणार नाही, असा पणच त्यांनी जाहीर केलाय
नवी दिल्ली / इस्लामाबाद : भारत आणि पाकिस्तान दरम्यान चालणारी समझौता एक्सप्रेस कायमची बंद करण्यात येत असल्याची घोषणा पाकिस्तानचे रेल्वे मंत्री शेख राशिद अहमद खान यांनी केलीय. इतकंच नाही तर जेव्हापर्यंत मी पाकिस्तानचा रेल्वेमंत्री असेल तेव्हापर्यंत समझौता एक्सप्रेस चालू देणार नाही, असा पणच त्यांनी जाहीर केलाय.
राशिद अहमद खान यांनी, ज्यांनी या घोषणेपूर्वीच समझौता एक्सप्रेसची तिकीटं खरेदी केली असतील त्यांना कोणताही चार्ज कापल्याशिवाय तिकीटाचे पैसे परत मिळतील, अशीही घोषणा केलीय.
यापूर्वी पाकिस्ताननं आपला ट्रेन ड्रायव्हर आणि गार्ड समझौता एक्सप्रेससोबत पाठवण्यात नकार दिला होता. अटारी रेल्वे स्टेशनला सूचना धाडत ही सेवा तत्काळ रोखण्याचे आदेश पाकिस्तान प्रशासनाकडून देण्यात आले होते. भारतीय रेल्वेनं आपला ड्रायव्हर आणि क्रू मेम्बर पाठवून समझौता एक्सप्रेस पाकिस्तानातून घेऊन जावी, असंही पाकिस्तानकडून सांगण्यात आलं. त्यानंतर भारतानं आपला ड्रायव्हर आणि क्रू मेम्बर इंजिनसोबत पाकिस्तानात पाठवला. भारताकडून पाठवण्यात आलेल्या या इंजिननं ट्रेन भारतात परत आणली. ही ट्रेन पाकिस्तानातून ११० प्रवाशांसोबत वाघा बॉर्डरवर दाखल झाली.
उल्लेखनीय म्हणजे, दिल्ली - लाहोर दरम्यान समझौता एक्सप्रेस दोन आठवड्यातून एकदा प्रवास करते. भारत - पाकिस्तानच्या प्रवाशांना सहजरित्या उभयदेशांत प्रवास करता यावा यासाठी शिमला करारांतर्गत १९७६ साली ही रेल्वे सुरू करण्यात आली होती. २०१९ सालीही पुलवामा हल्ल्यानंतर बालाकोट एअर स्ट्राईकनंतर समझौता एक्सप्रेस थांबवण्यात आली होती.
काश्मीरमध्ये अनुच्छेद ३७० आणि ३५ ए रद्द करण्याच्या भारताच्या संसदेच्या निर्णयानंतर पाकिस्ताननं भारतासोबतचे द्विपक्षीय संबंध स्थगित केले आहेत. तसेच भारताचे पाकिस्तानमधील उच्चायुक्त अजय बिसारिया यांनाही पाकिस्तान सोडावं, असं बजावण्यात आलंय. जम्मू काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रांमध्ये नेणार असल्याचं पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी म्हटलंय.