नवी दिल्ली : थायलंडमध्ये अडकलेल्या फुटबॉल संघातील आठ जणांना गुहेतून बाहेर काढण्यात आलेलं आहे. या मुलांची प्रकृती चांगली असल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान या मुलांच्या नावांच्या बाबतीत कमालीची गुप्तता ठेवण्यात आली आहे. जी मुलं अजूनही गुहेत अडकली आहेत त्यांचे पालक आणि बाहेर काढण्यात आलेल्या मुलांच्या पालकांमध्ये काही गैरसमज होऊ नये यासाठी यासाठी ही काळजी घेण्यात आली आहे. अजून चार खेळाडू आणि एक प्रशिक्षक गुहेमध्ये अडकून पडलेले आहेत. त्यांनाही बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या बचाव पथकाकडे साऱ्या जगाचं लक्ष असून जगभर याच घटनेची चर्चा सुरु आहे. 


थायलंडमध्ये एका गुहेत अडकलेल्या या मुलांना सुखरुप बाहेर काढण्य़ाचं आव्हान जवानांपुढे आहे. शनिवारी गुहेमध्ये पाणी सगळ्यात कमी स्तरावर जाऊन पोहोचले होते त्यानंतर अधिकाऱ्यांनी निर्णय घेतला होता की मुलांनी बाहेर काढण्यासाठी ही योग्य वेळ आहे. थायलंडचे पाणबुडे या मिशनचे नेतृत्व करत आहेत. या मोहिमेत आस्ट्रेलिया, ब्रिटेन आणि यूरोपसह अन्य देश देखील थायलंडच्या मदतीला धावून आले आहेत. थायलंडच्या अंडर 16 फुटबॉलची ही टीम त्यांच्या 25 वर्षीय कोचसह 23 जूनपासून गुहेत अडकले आहेत.