Russia Ukraine crisis : युक्रेनच्या राजधानीसह अनेक शहरांमध्ये रशियन सैन्याकडून स्फोट, महाभयंकर Video Viral
एखाद्या देशाच्या राजधानीवरच हल्ले होणं ही गंभीर बाब आहे. संपूर्ण जगालाच आता या युद्धामुळं धास्ती लागली आहे
नवी दिल्ली : युक्रेनकडून होणारा विरोध पाहता अखेर रशिया आणि युक्रेन हा वाद विकोपास गेला आणि रशियाकडून युक्रेनमधील काही भागात रशियाकडून सैन्य कारवाईची घोषणा करण्यात आली. (Russia Ukraine crisis )
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांनी केलेली ही घोषणा म्हणे महायुद्धाची सुरुवात तर नाही, याचीच भीती संपूर्ण जगातून व्यक्त केली जात आहे.
AFP या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रपती पुतीन यांच्या या घोषणेनंतर लगेचच युक्रेनची राजधानी असणाऱ्या किव आणि इतरही अनेक शहरांमध्ये रशियन सैन्याकडून मोठे स्फोट घडवून आणल्याची माहिती समोर आली.
युक्रेनच्या राज्यांमध्ये होणाऱ्या या स्फोटांचे व्हिडीओ सध्या काही सोशल मीडिया युजर्सनी शेअर केले आहेत.
जिथे शहरं अंधारात असताना सुरु असणारे स्फोट आणि त्यामुळं होणारा आवाज धडकी भरवणारे ठरत आहेत.
युक्रेननं मर्यादेची रेषा ओलांडल्याचं पुतीन यांनी म्हटलं असून, त्यांनी दिलेल्या या आदेशाला आता मागे घेण्याचं आवाहन संयुक्त राष्ट्रांकडून करण्यात आलं आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या या आवाहनाला उत्तर देत असताना आपला युक्रेनवर संपूर्ण ताबा मिळवण्याता कोणताही हेतू नसल्याचं पुतीन यांनी स्पष्ट केलं.
गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेन वाद धुमसत होता. ज्यानं आज अखेर पेट घेतला. पाश्चिमात्य देशांनीही या दोन्ही देशांमध्ये असणारा तिढा सामंजस्यानं सोडवण्याचे प्रयत्न सुरु केले.
यातच पुतीन यांनी युक्रेनमधील दोन भाग नव्या देशाच्या रुपात मान्य केले. परिणामी युरोप, अमेरिका आणि इतरही अनेक राष्ट्रांनी या भूमिकेसाठी रशियावर अनेक निर्बंध लादले.
(वरील सर्व व्हिडीओ हे सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत. यांची अधिकृतता प्रतिक्षेत आहे.)