डाळीची फोडणीही महागली, रशिया- युक्रेन युद्धामुळे जगावं की मरावं... हाच प्रश्न
ठिणगीचा वणवा झाला असून, सारं जग त्यामध्ये होरपळत आहे.
नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांमध्ये युद्धाची ठिणगी पडलेली असतानाच आता नाही म्हणात संपूर्ण जगावर याचे परिणाम होताना दिसत आहेत. रशिया युक्रेनमध्ये सुरु असणाऱ्या आक्रमणामध्ये माघार घेताना दिसत नाही. तोच आता युक्रेननंही युद्धात रशियाला टक्कर देण्याचा निर्धार केला आहे. याच ठिणगीचा वणवा झाला असून, सारं जग त्यामध्ये होरपळत आहे. (Russia Ukraine war)
सोनं- चांदी आणि साधं जिरंही महाग...
रशिया युक्रेन युद्धामुळे सोने-चांदीच्या दरांवर थेट परिणाम झाले आहेत. सोन्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या जळगाव मार्केटमध्ये सोन्याच्या दरात 200 रुपये तर चांदीच्या दरात 1000 रुपयांनी वाढ झाली आहे.
यामुळे सोन्याचे आजचे भाव 52,400 रुपये प्रतितोळ्यावर गेले आहेत. तर, चांदी 71 हजार रुपये प्रतिकिलोवर गेली आहे.
घरांच्या किमतीही वाढल्या...
युद्धामुळे घरांच्या किंमती वाढण्याचीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. रशिया-युक्रेनच्या युद्धाचा फटका सर्वसामान्यांनाही बसत आहे.
स्टील, सिमेंट, रेती, विटांच्या भावात वाढ होणार असल्याने आपोआपच घरांच्या किंमती वाढणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य घर खरेदीदाराला याचा फटका बसणार आहे..
जिरं, मिर्ची महाग...
रशिया-युक्रेन युद्धामुळे तेल आणि धान्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. फोडणीसाठी लागणारे जिरे ,लाल मिरची आता 250 रूपये किलो दरापर्यंत पोहचले आहेत. तर, दालचिनी 290 वरून 330 रू.किलोपर्यंत पोहचली आहे. मैदा, गव्हाचं पीठ, रवा यांचेही दर काही प्रमाणात वाढले आहेत.
युक्रेन-रशिया युद्धामुळे खाद्यतेलाच्या किमती गगनाला भिडल्याने त्याचा इतर वस्तूवरही परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. किराणा बाजारातील बहुतेक वस्तूचे दर वाढलेत.
नागरिकांचं आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडलंय. खाद्यतेल जवळपास 25 ते 30 रुपयांनी तर गहू 10 रुपयांनी महागला, तर शेंगदाणा दरातही पाच रुपयांची वाढ झालीय.
काय आहे सध्याची परिस्थिती ?
राजधानी कीव्ह जिंकण्यासाठी रशियानं युक्रेनमधील हल्ले वाढवले आहेत. ज्यासाठी कीव्ह शहराला रशियन सैन्यानं तीनही बाजूनं घेरलं आहे. या शहरावर रशियानं जोरदार हल्ले सुरु केले आहेत.
दरम्यान, युद्धात रासायनिक शस्त्रांचा वापर केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा अमेरिकेनं रशियाला दिलाय.