India-China Border Dispute: चीन पुन्हा एकदा भारताला डिवचण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. याचं कारण चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेववर स्थित अक्साई चीनमध्ये भूमिगत बांधकामं केली आहेत. चीनने अक्साई चीनमध्ये तटबंदी उभी केली असून, बंकर खोदले असल्याचं समोर आलं आहे. मॅक्सर या आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनीच्या सॅटेलाईट फोटोंमधून हा खुलासा झाला आहे. या फोटोंमध्ये नदीशेजारी असणाऱ्या टेकडीवर सैन्यांसाठी तटबंदी आणि शस्त्रं ठेवण्यासाठी बंकर उभे केल्याचं दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक विशेषज्ञांनी या फोटोंचं विश्लेषण केलं असून, त्यांच्या मते गेल्या अनेक महिन्यांपासून हे बांधकाम सुरु असल्याचं दिसत आहे. भारताच्या कथित सैन्य हालचालींना उत्तर देण्यासाठी चीनने हे धोरण आखल्याचं फोटोंमुळे स्पष्ट होत आहे. भारताचे हवाई हल्ले आणि जमिनीवरुन युद्ध झाल्यास योग्य अंतर ठेवण्यासाठी चीनने ही तटबंदी उभारली असल्याचं बोललं जात आहे.
 
गलवानमध्ये भारतीय सैन्यांशी झडप झाल्यानंतर चीनने आक्रमक भूमिका घेतली असून हे बांधकाम त्यावरील प्रतिक्रिया असण्याची शक्यता आहे. तसंच अक्साई चीनमधून भारतीय हवाई दलाची उपस्थिती कमी करण्याचा प्रयत्न असेल. 


"सीमेच्या अगदी जवळ भूमिगत सुविधा उभारून आणि भूमिगत पायाभूत सुविधांचा विकास करून, चिनी रणनीतीकारांनी अक्साई चीनमध्ये भारतीय वायुसेनेचं वर्चस्व कमी करत संतुलन साधण्याचा प्रयत्न असावा," असं इंटेल लॅबमधील एक प्रमुख उपग्रह प्रतिमा विशेषज्ञ डॅमियन सायमन यांनी म्हटलं आहे. 


नकाशात अरुणाचल प्रदेश आणि अक्साई चीन दाखवला आपला भाग


भारतात पुढील महिन्यात जी-20 परिषद सुरु होणार असून, त्याआधीच चीनने आपले रंग दाखवण्यात सुरुवात केली आहे. सोमवारी चीनने आपला अधिकृत नकाशा जाहीर करत वादाला तोंड फोडलं आहे. या नकाशात चीनने अरुणाचल प्रदेश, अक्साई चीन, तैवान आपला भाग असल्याचं सांगितलं आहे. 



सरकारी माध्यम ग्लोबल टाइम्सने ट्विटरला एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी सांगितलं आहे की "चीनच्या अधिकृत नकाशाची आवृत्ती सोमवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. हे नैसर्गिक संसाधन मंत्रालयाने होस्ट केलेल्या स्टँडर्ड मॅप सर्व्हिसच्या वेबसाइटवर सुरू केले आहे. हा नकाशा चीन आणि जगातील विविध देशांच्या राष्ट्रीय सीमा दर्शवत असून रेखाचित्र पद्धतीच्या आधारे संकलित केले आहे."


चीनच्या कम्युनिस्ट सरकारचे मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सने पोस्ट केलेला नकाशा, चीनने दक्षिण तिबेट म्हणून दावा केलेल्या अरुणाचल प्रदेश आणि 1962 च्या युद्धात ताब्यात घेतलेला अक्साई चीनला आपला भाग म्हणून दर्शवलं आहे. भारताने चीनला वारंवार सांगितलं  आहे की अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील.