दाऊद इब्राहिमवर विषप्रयोगाचा दावा; पाकिस्तानात सोशल मीडिया डाऊन, इंटरनेट ठप्प?
Dawood Ibrahim News: कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद ह्याच्यावर कराचीमध्ये विषप्रयोग करण्यात आला असल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे.
Dawood Ibrahim News: मुंबईत झालेल्या बॉम्बस्फॉटाचा मास्टरमाइंड दहशतवादी दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. दाऊद याची प्रकृती चिंताजनक असल्याचे दावे सोशल मीडियावर करण्यात येत आहे. दाऊद यांच्या प्रकृतीबाबत चर्चा सुरू असतानाच संपूर्ण पाकिस्तानातील इंटरनेट सेवा ठप्प करण्यात आली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मदेखील डाउन करण्यात आले आहेत. पाकिस्तानात इंटरनेट आणि सोशल मीडिया डाऊन केल्यामुळं युजर्समध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सरकारमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ(पीटीआय)चे अध्यक्ष इम्रान खान यांची व्हर्चुअल रॅली होती. त्यामुळं वातावरण बिघडू नये या रॅलीच्या आधीच इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अनेकजण दाऊद इब्राहिमच्या प्रकृतीबाबत धागा जोडून पाहत आहेत. सोशल मीडियावर दाऊद इब्राहिमबाबत अफवा पसरवण्यात येत आहे. हे प्रकरण संवेदनशील असल्याने इंटरनेट सेवा ठप्प करण्यात आल्या आहेत, असंही सांगण्यात येतंय. मात्र. अद्याप याबाबत कोणीही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलं नाहीये.
संपूर्ण पाकिस्तानात युजर्सना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरण्यास अडचणी येत आहेत. इम्रान खान यांची रॅली रविवारी रात्री 9 वाजता सुरू होणार होती मात्र, त्यापूर्वीच इंटरनेट स्लोडाउन करण्यात आले. त्यामुळं रॅली स्ट्रीम करण्यास अडचणी येऊ लागल्या. युजर्सना रात्री आठ वाजल्यापासून लाहौर, कराची आणि इस्लामाबादमध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरण्यास अडचणी येत आहेत. युजर्सनी इंटरनेट स्लो झाल्याची तक्रार केली आहे.
दरम्यान, दाऊद इब्राहिमवर कराची येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसंच, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचेही म्हटलं जात आहे. दाऊन इब्राहिम गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानातील कराचीमध्ये वास्तव्यास आहे. तिथेच त्याच्यावर विषप्रयोग करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या बातमीत दाऊदच्या प्रकृतीबाबत म्हटलं आहे. मात्र, अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दाऊदला मारण्याचा प्रयत्न कोणी केला, त्याला विष कोणी दिले याबाबतही अद्याप काहीच माहिती हाती लागलेली नाही.
दाऊद इब्राहिम आयएसआयच्या कडेकोट सुरक्षेत असतो. त्याच्यापर्यंत सामान्य माणूसही पोहोचू शकत नाही. त्यामुळे त्याला विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, अशी शक्यताही वर्तवली जाते आहे. तसंच, दाऊद इब्राहिम भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहे. 1993 मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटात दाऊदचा समावेश होता.