Moon Walk: चंद्रावर असा दिसतो फॅशन शो, Video पाहून म्हणाल कसलं भारीये हे!
Fashion on Moon : चंद्राचं आपल्या आयुष्यातील स्थान नेमकं किती महत्त्वाचंय हे आपण जाणतो. हाच चंद्र आता फॅशन जगतातही आपली जागा बनवतोय बरं!
Fashion on Moon : पूर्वी जो चंद्र अंगाई आणि कवितांमधून किंवा मग चारोळ्यांमधून आपल्या भेटीला येत होता तोच चंद्र आता मात्र आपल्या इतका जवळ आला आहे, की या चंद्रावर पोहोचण्याची इतकंच काय तर या चंद्रावर जाऊन राहण्याचीच स्वप्न मानव पाहू लागला आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान आता इतकं पुढं गेलंय की जगातील बरेच देश त्यांच्या अंतराळ संशोधन संस्थांच्या माध्यमातून चंद्रावरील जमीन, परिस्थिती, तेथील वातावरण या साऱ्याचा अभ्यास करताना दिसत आहे. इतकंच काय तर काहींनी तर या चंद्रावर म्हणे जमिनीही खरेदी केल्या आहेत.
अशक्य वाटणारा हा पृथ्वीचा उपग्रह खरंच इतका जवळ आलाय? तरीही तुम्हाला हाच प्रश्न पडतोय? तर सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहा. जिथं चक्क चंद्रावरील फॅशन शो पाहायला मिळत आहे. विश्वास बसत नाहीये? अहो इथं चक्क मॉडेल्स चंद्रावर उतरल्या, छानछान आणि डिझायनर कपडे घालून त्यांना स्पेससूटमध्ये बदलत ही मंडळी रॅम्पवर आली आणि उड्या मारत मारत चालू लागली.
हेसुद्धा वाचा : NASA नं टीपला अवकाशातील ताऱ्यांनी तयार केलेला पक्षी
हे सर्व चंद्रावर घडत होतं, पण हा चंद्र मात्र काल्पनिक असून, तो या फॅशन शोसाठीच तयार करण्यात आला होता. ANREALAGE कडून चंद्र आणि चंद्रावरील फॅशन शो या धर्तीवर आधारित एक संकल्पना आकारास आणली गेली. चंद्रावर 2023 पर्यंत मानवी वावर सुरु झालाच तर, तिथं ही मंडळी नेमके कसे कपडे वापरतील याचा विचार करून या ब्रँडनं स्पेससूट बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कापडाचा वापस करत फॅशनेबल आऊटफिट डिझाईन केले.
चंद्रावरील कपडे पृथ्वीवर नेमके कसे दिसतील, याचंसुद्धा कल्पक चित्र इथं रॅम्पवर मांडण्यात आलं. नासाशी हातमिळवणी करत हा आगळावेगा फॅशन शो पार पडला. जिथं असे कपडे जगानं पाहिले जे उणे 196 अंश तापमानातही तुमचा सहज बचाव करतील. कल्पनाशक्ती, विज्ञान आणि तंत्रज्ञानाची सांगड घालत कमालीचं महत्त्वाकांक्षी दृश्य या फॅशन शोच्या निमित्तानं सर्वांनीच पाहिलं.