Menstrual Leave: ऐतिहासिक निर्णय! मासिक पाळीदरम्यान महिलांना सुट्टी; नवा कायदा लागू
Menstrual Leave: मासिक पाळीदरम्यान महिलांना हक्काची सुट्टी मिळावी का? या प्रश्नावरून दोन गट झाल्याचं पाहायला मिळतं. होकार आणि नकारार्थी उत्तरांमध्ये जुंपलेली असतानाच एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.
Period Leave: महिलांच्या (Women health) शरीरात होणारे बदल आणि यामुळं त्यांना होणारा त्रास या मुद्द्यावर गेल्या काही वर्षांमध्ये खुलेपणानं बोललं जात आहे. मासिक पाळी (Menstrual cycle) हा विषय आता न्यूनगंडाचा राहिलेला नसला तरीही मासिक पाळीदरम्यान मिळणाऱ्या सुट्टीबाबतचा वाद मात्र निकाली निघताना दिसत नाही. अशी परिस्थिती असतानाच एका देशाकडून मासिक पाळीदरम्यान नोकरदार वर्गातील महिलांना भरपगारी सुट्टी देण्याच्या कायद्याला मान्यता मिळाली आहे.
युरोपातील चौथा सर्वाधिक लोकसंख्या असणारा हा देश म्हणजे स्पेन (Spain News). असा निर्णय आणि कायदात लागू करणारा स्पेन (Spain) हा पहिलाच सांघिक देश ठरला आहे. यापूर्वी जपान, झाम्बिया या देशांमध्येसुद्धा अशाच पद्धतीचा नियम लागू करण्यात आला आहे. ज्या यादीत आता स्पेनचाही समावेश झालेला आहे.
स्त्रीवादी प्रगतीसाठी हा एक ऐतिहासिक दिवस आहे, अशी प्रतिक्रिया स्पेनच्या Equality Minister इरेन मोंटेरो यांनी दिली. या नव्या कायद्याअंतर्गत स्पेनमध्ये महिलांना आता मासिक पाळीदरम्यान भरपगारी सुट्टी मिळण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. स्पेनमधील संसदेमध्ये एकूण 185 मतांपैकी या कायद्याच्या बाजूनं 154 मतं देण्यात आली. बहुमतानं या ठरावाला मंजुरी मिळाल्यामुळं सरकारनं हा कायदा मान्य केला.
या कायद्याला का होतोय विरोध?
मासिक पाळीदरम्यान सुट्टी, हा कायदा स्तुत्य असला तरीही त्याला स्पेनमधील काही कामगार संघटनांनी विरोध केला आहे. UGT (Unión General de Trabajadores ) या संघटनेन या कायद्यावरून नाराजीचा सूर आळवला असून नोकरीच्या ठिकाणी असणाऱ्या महिलांच्या दृष्टीनं तो हितकारक नसल्याचं मत त्यांच्याकडून मांडण्यात येत आहे. मासिक पाळीदरम्यान मिळणाऱ्या सुट्टीचे थेट परिणाम महिलांच्या Professional आणि Private अशा दोन्ही आयुष्यांवर होतील ही बाबही अनेकांनी अधोरेखित करण्यास सुरुवात केली आहे.
स्पेनमध्ये तृतीयपंथी कायद्यालाही मंजूरी
स्पेनमध्ये आणखी एका महत्त्वाच्या कायद्यालाही मान्यता देण्यात आली आहे. जिथं वयाची 16 वर्षे पूर्ण केल्यानंतर कोणत्याही व्यक्तीला राष्ट्रीय ओळखपत्रावर लिंगबदल करण्याची परवानगी असेल.