कोलोंबो : Sri Lanka New President: श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती यांची निवड झाली आहे. आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेला नवा राष्ट्राध्यक्ष मिळाला आहे. रानिल विक्रमसिंघे यांची श्रीलंकेच्या संसदेने नवे अध्यक्ष म्हणून निवड केली आहे. रनिल विक्रमसिंघे हे 134 मतांनी विजयी झालेत. राष्ट्रपतीपदी नियुक्ती झाल्यानंतर रानिल विक्रमसिंघे म्हणाले की, आपला देश अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहे. आमच्यासमोर मोठी आव्हाने आहेत. ती दूर करण्याचा माझा प्रयत्न असेल.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीलंकेत आज सकाळी 10 वाजल्यापासून नव्या राष्ट्रपतींच्या निवडीसाठी मतदानाला सुरुवात झाली. अध्यक्षपदासाठी तीन उमेदवारांमध्ये लढत होती. रानिल विक्रमसिंघे, डॅलस आल्हापेरुमा आणि डाव्या पक्षाच्या जनता विमुक्ती पेरामुना (जेव्हीपी) नेत्या अनुरा कुमारा दिसानायके यांना मंगळवारी अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून खासदारांनी घोषित केले होते. यानंतर बुधवारी झालेल्या निवडणुकीत रानिल विक्रमसिंघे विजयी झाले आहेत. संसदेने त्यांची नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे.  राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकण्यासाठी कोणत्याही उमेदवाराला देशाच्या 225 सदस्यांच्या संसदेत 113 पेक्षा जास्त मते मिळणे आवश्यक होती.


देशात आणीबाणी लागू आहे 


देशातील सर्वात वाईट आर्थिक संकटाचा सामना करण्यात श्रीलंका सरकार अपयशी ठरल्यानंतर, लोक रस्त्यावर उतरले आणि गोटाबाया राजपक्षे यांनी देशातील राजकीय गोंधळ आणि अराजकता दरम्यान राष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला. सध्या देशात आणीबाणी लागू आहे.


श्रीलंकेत 1978 नंतर प्रथमच राष्ट्रपतींची निवड खासदारांच्या गुप्त मतदानाने झाली. यापूर्वी 1993 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती रणसिंह प्रेमदासा यांची हत्या झाल्यानंतर कार्यकाळाच्या मध्यभागी अध्यक्षपद रिक्त झाले होते. त्यावेळी संसदेने प्रेमदासाचा कार्यकाळ पूर्ण करण्याची जबाबदारी डीबी विजेतुंगा यांच्यावर एकमताने सोपवली होती.


श्रीलंकेत परिस्थिती आणखी बिघडलेय



देशात परकीय चलनाच्या साठ्याच्या तीव्र टंचाईमुळे अन्नपदार्थ, इंधन आणि औषधे यासारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या आयातीवर वाईट परिणाम झाला आहे. परकीय कर्ज 50 अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या वर गेले आहे. यावर्षी श्रीलंकेला 7 अब्ज अमेरिकन डॉलर्सचे कर्ज फेडायचे आहे. श्रीलंकेतील आर्थिक संकट मार्चमध्ये सुरु झाले. आधी कमी प्रमाणात लोक विरोध करत होते. दूध पावडर, नियमित वीजपुरवठा यासारख्या मूलभूत मागण्यांसाठी आंदोलन करु लागले होते. आता तेथे परिस्थित बिकट आहे.