Taiwan Earthquake video: तैवानची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तैपेई शहराला भूकंपाचे हादरे बसले आणि एका क्षणात उभ्या इमारती पत्त्यांच्या बंगल्यांप्रमाणं कोसळण्यास सुरुवात झाली. प्राथमिक माहितीनुसार तैवानच्या पूर्वेकडील किनारपट्टी भागामध्ये आलेल्या या भूकंपाची तीव्रता 7.5 ते 7.2 रिश्टर स्केल इतकी मापण्यात आली. यूएस जियोलॉजिकल सर्वे (USGS) च्या माहितीनुसार हा भूकंप इतका मोठा होता की, त्यामुळं (Japan) जपानच्या दक्षिणेकडे असणाऱ्या अनेक बेटांनाही हादरा बसला. अधिकृत माहितीनुसार मागील 25 वर्षांमध्ये तैवानला बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यांपैकी हा सर्वात मोठा धक्का ठरला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तैवानमध्ये आलेल्या या भूकंपामध्य मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाली असून, अनेक मोठ्या इमारतीही जमीनदोस्त झाल्या. दरम्यान, भूकंपाचे हादरे जाणवण्यास सुरुवात झाल्याक्षणी नागरिकांनी घरांमधून पळ काढण्यास सुरुवात करत सुरक्षित ठिकाणी सगळ्यांनीच धाव मारली. अद्याप या संकटात एकाचा मृत्यू आणि 50 जण जखमी झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. सध्या भूकंप प्रभावित क्षेत्रात बचावकार्य तातडीनम सुरु करण्यात आलं असून, प्रभावित भागांमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. तर, जखमींवरही प्रथमोपचार सुरु करण्यात आले आहेत. 



तैवानमधील हुआलियन येथून भूकंपाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ समोर आले, जिथं मोठाल्या इमारती कोसळतानाची दृश्य़ संपूर्ण जगाचा थरकाप उडवून गेली. तैवानमध्ये सद्यस्थितीला अनेक घरांचं नुकसान झालं असून, देशातील रेल्वे सेवा यामुळं विस्कळीत झाली आहे. त्याशिवाय वीजपुरवठाही खंडीत झाला असून, सध्या काही इमारतींमध्ये नागरिक अडकले असण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. 


हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather News : 20 दिवस धोक्याचे! वाढता उकाडा पाहता राज्यातील 'या' भागांसाठी यलो अलर्ट 


दरम्यान, तैवानमधील भूकंप इतका भयंकर होता, की त्याचे परिणाम जपानपर्यंत दिसले. सध्या जपानच्या किनारपट्टी भागांनाही या धर्तीवर सतर्कतेचा इशारा दिला असून, त्सुनामीचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. तैवानमधील या भूकंपानंतर जपानच्या समुद्री क्षेत्रामध्ये तीन मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ज्या कारणास्तव नागरिकांनाही सुरक्षित स्थळी स्थलांतरिक होण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.