Ayman al Zawahiri: मोठी बातमी! अमेरिकेकडून अल-कायदाचा म्होरक्या अयमान अल-जवाहिरीचा खात्मा
अखेर अमेरिकेचा सूडाग्नी शांत...
Ayman al Zawahiri: अल-कायदा (Al Qaeda) म्होरक्या अयमान अल-जवाहिरी अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी या बातमीला दुजोराही दिला आहे. काबुलमध्ये करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात त्याला ठार करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
अमेरिकेच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार 31 जुलै रोजी जवाहिरी याला ठार मारण्यात आलं. 71 वर्षीय जवाहिरी एकेकाळी ओसामा बिन लादेनचा खासगी चिकित्सक म्हणून काम पाहत होता. अमेरिकेकडूनच ओसामाचा खात्मा केल्यानंतर जवळपास 11 वर्षांनंतर जवाहिरीला संपवण्यात यश आलं.
अफगाणिस्तानातील काबुल येथे असणाऱ्या एका सेफहाऊसमध्ये जवाहिरी शरण होता. तिथे त्याच्यावर दोन हेलफायर मिसाईलनं हवेतून मारा करत ही मोहिम पूर्ण करण्यात आली. 31 जुलै रात्री 9 वाजून 48 मिनिटांनी हा हल्ला करण्याक आला. हल्ल्याच्या वेळी काबुलमध्ये कोणीही अमेरिकन अधिकारी, सैनिक हजर नसल्याचंही कळत आहे.
सदर मोहिमेला यश मिळताच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी एक व्हिडीओ शेअर करत जगाला संबोधित केलं. 'अल जवाहिरी 9/11 दहशतवादी हल्ल्यात सहभाही होता. या हल्ल्यामध्ये 2,977 जणांना जीव गमावावा लागला होता. ज्यासाठी जवाहिरी जबाबदार होता. कैक वर्षे तो अमेरिकेच्या निशाण्यावर होता', असं ते म्हणाले.
तालिबानची पहिली प्रतिक्रिया
तालिबानचे प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद यांनी घटनेनंतर प्रतिक्रिया देत हा हल्ला अमेरिकेच्या ड्रोननं करण्यात आल्याची माहिती दिली. आंतरराष्ट्रीय सिद्धांत आणि डोहा कराराचं उल्लंघन झाल्याचं म्हणत तालिबानकडून या घटनेचा निषेध करण्यात आला.