वॉशिंग्टन : अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणूक आज आहे. अमेरिकेला महान करण्याची प्रलोभने दाखवणारे रिपब्लिकन पक्षाचे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प विजयी होणार की,‘अमेरिकन ड्रीम’ म्हणजे सर्वसमावेशक अमेरिकेची खंडित परंपरा पुढे नेणारे डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार आणि माजी उपाध्यक्ष जो बायडेन बाजी मारणार याकडे सर्वाच्या नजरा लागलेल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणूक चुरशीची होणार आहे. ट्रम्प यांनी टपालाचे आणि लोकांनी मतपत्रिकातून आधीच केलेले मतदान मोजण्याबाबत वाद घातले आहेत. पेनसिल्वानियातील टपाली मते आणि इतर मते याबाबत त्यांनी आधीच आक्षेप घेतले आहेत. 


निवडणुकीनंतर  ही मते गोळा करून त्यांची गणना करणे कठिण आहे. त्यात बराच वेळ जाऊ शकतो. त्यामुळे निवडणुकीची रात्र संपताच आम्ही वकिलांची गाठ घेऊन न्यायालयात दाद मागणार आहोत असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.


सध्याच्या परिस्थितीत जनमत चाचण्यानुसार  ट्रम्प यांना जिंकण्याची ४२ टक्के संधी तर बायडेन यांना ५१ टक्के संधी मिळणार आहे. दी न्यूयॉर्क टाइम्सच्या मते बायडेन यांची बाजू भक्कम असून २००८ पासूनच्या कुठल्याही अध्यक्षीय उमेदवारापेक्षा त्यांची बाजू मजबूत आहे. डेमोक्रॅटिक पक्षाने भारतीय वंशाच्या कमला हॅरीस यांना उपाध्यक्षपदाची उमेदवारी देऊन भारतीय वंशाच्या लोकांची मते खेचण्याचा प्रयत्न केला आहे.


२०१६ पेक्षा सर्वाधिक मतदारांनी ३ नोव्हेंबर आधीच मतदान केले आहे.  करोना काळातील प्रचार, करोना संसर्ग झालेला असताना अध्यक्ष ट्रम्प यांनी केलेले बेजबाबदार वर्तन,  व्यक्तिगत आरोप यामुळे ही निवडणूक गाजली आहे. 


 ३ नोव्हेंबरला मतदान कसे होणार ?  


अमेरिकेतील सिनेटच्या ३५ जागा, अमेरिकी काँग्रेसच्या ४३५ जागा याशिवाय अकरा राज्यांचे गव्हर्नर यासाठी मतदान होत आहे.  काहींनी व्यक्तिगत पातळीवर, काहींनी टपालाने आणि मतपेटीतून मतदान केले. २०१६ मधील निवडणुकीत जे मतदान आधीच झाले होते त्यापेक्षा हे प्रमाण ६४ टक्के आहे. ९.३२ कोटी मतदान आधीच मतपत्रिकेने झालेले आहे. ३.१९ कोटी मतदारांनी टपालाने मतदान केले आहे. एकूण १० कोटीहून अधिक मतदान झाले आहे. एकूण मतदार २४ कोटी आहे.


कुणाची आघाडी आहे?  


बायडेन हे आठही राज्यांत जनमत चाचणीनुसार आघाडीवर आहेत. अ‍ॅरिझोना, फ्लोरिडा, आयोवा, मिशीगन, नेवाडा, उत्तर कॅरोलिना, पेनसिल्वानिया, विस्कॉन्सिन ही ती राज्ये आहेत. ट्रम्प हे जॉर्जिया, ओहायो या दोन राज्यांत आघाडीवर आहेत. टेक्सासमध्येही ते आघाडीवर आहेत पण तो रिपब्लिकनांचा बालेकिल्ला आहे. 


कृष्णवर्णीयांविरोधातील पोलिसी अत्याचार त्यानंतर उसळलेल्या दंगली यामुळे ट्रम्प हे वर्णवर्चस्ववादी असल्याचे स्पष्ट झाले. ब्लॅक लाइव्हज मॅटर या चळवळीचा मतदानावर प्रभाव पडण्याची शक्यता आहे. बायडेन यांनी प्रचारात करोनाची साथ गलथानपणे हाताळल्याबाबत ट्रम्प यांना लक्ष्य केले होते. अमेरिकेत २ लाख २९  हजार लोक करोनाने मरण पावले त्याचे प्रतिबिंब मतदानात दिसेल अशी शक्यता आहे.