वॉशिंग्टन : कॅपिटॉल बिल्डिंग हिंसाचारप्रकरणी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालणार आहे. सदनाच्या 215 पेक्षा अधिक डेमोक्रेट आणि 5 रिपब्लिकन खासदारांनी याला समर्थन दिलं आहे. महाभियोग चालवण्यासाठी 218 मतांची गरज होती. कॅपिटॉल बिल्डिंगवर गेल्या आठवड्यात झालेला हिंसक हल्ला पाहता अमेरिकेचे मावळते राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधातील महाभियोगाच्या प्रस्तावावर डेमोक्रेटिक नेत्यांच्या नियंत्रणाखालील अमेरिकन प्रतिनिधी सभेने बुधवारी मतदान केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाभियोग प्रस्तावावर मतदानासह ट्रम्प अमेरिकेच्या इतिहासातील पहिले असे राष्ट्रपती बनले आहेत ज्यांच्याविरोधात दोनदा महाभियोग चालणार आहे. खासदार जॅमी रस्किन, डेव्हिड सिसिलिने आणि टेड लियू यांनी महाभियोगाचा प्रस्ताव तयार केला होता. या प्रस्तावाला प्रतिनिधी सभेच्या २११ सदस्यांनी अनुमोदन दिले होते. या महाभियोग प्रस्तावात ट्रम्प यांच्यावर ६ जानेवारी रोजी राजद्रोहासाठी चिथावणी दिल्याचा आरोप लावण्यात आला आहे. 


डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना कॅपिटॉल बिल्डिंगला घेरण्यासाठी तेव्हा चिथावणी दिली जेव्हा तिथे इलेक्ट्रॉल कॉलेजच्या मतांची मोजणी सुरु होती, असंही या प्रस्तावात म्हटलं आहे.