रशियामधील एका चार्टर्ड विमानाचा दरवाजा विमान हवेत असतानाच उघडल्याचा (Video Russian Plane Door Open in Air) विचित्र प्रकार घडला आहे. या बातमीची पहिली ओळ वाचूनच तुम्हाला आश्चर्चयाचा धक्का बसेल. मात्र खरोखर हा प्रकार घडला असून त्याचा व्हिडीओही समोर आला आहे. न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार या रशियन विमानाचा मागचा दरवाजा विमान उड्डाण घेत असतानाच उघडला. ही घटना समोवारी एएन-२६ ट्विन प्रॉप प्रकाराच्या विमानाबरोबर घडली. या विमानाने रशियामधील सायबेरिया प्रांतातील मगन शहरातून उड्डाण केलं होतं. उणे ४१ डिग्री तापमानामध्ये या विमानाने उड्डाण केलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार चालक आणि विमानातील कर्मचाऱ्यांबरोबरच एकूण २५ प्रवासी या विमानामधून प्रवास करत असताना हा प्रकार घडला. उड्डाण घेण्याच्या तयारीत असलेल्या विमानाचं मागचं दार उघडल्याने एकच गोंधळ उडाला. एका प्रवाशाने हा संपूर्ण घटनाक्रमाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये विमानाचा दरवाजा अचानक उघडल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ पोस्ट करणारा प्रवासी मात्र या साऱ्या गोंधळाचं चित्रिकरण करताना आपल्या सीटवर बसून निवांतपणे हसताना दिसत आहे. वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे विमानाच्या दाराजवळचा पडदा फडफडताना दिसत आहे. 


सुदैवाने या सर्व प्रकारामध्ये कोणीही जखमी झालेलं नाही. वैमानिकाला वेळीच हा गोंधळ लक्षात आल्याने त्याने तातडीने विमान मगन येथील विमातळावर उतरवलं. दरम्यान या साऱ्या प्रकारादरम्यान थंड हवेने गारठलेल्या प्रवाशांनी कोट ओढून घेतल्याचं दिसून आलं.




यूक्रेनच्या सुरक्षा मंत्र्यांचे सल्लागार एटोन गेराशचेंको यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. मगनमधून उड्डाण करणाऱ्या रशियाच्या एएन-२६-१०० विमानाचं एक दार अचानक उघडलं. यावेळी विमानात २५ प्रवासी होते. यानंतर वैमानिकाने तातडीने विमान खाली उतरवलं.