Snake In Bedroom: चादर बदलायला बेडरुममध्ये गेली अन् जगातील दुसरा सर्वात विषारी साप समोर पाहिल्यानंतर तिने...
Women Found snake in her bedroom: ही महिला आपल्या बेडरुममधील बेडवरील चादर बदलण्यासाठी गेली असता तिला हा साप दिसला आणि तिला धक्काच बसला. या सापाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.
2nd Most Poisonous Snake In Bedroom: जगातील सर्वाधिक धोकादायक सरपटणारे प्राणी सापडणारा देश म्हणजे ऑस्ट्रेलिया. या देशामध्ये अगदी टॉयलेटच्या कमोडपासून ते रस्त्याच्या बाजूलाही साप आणि मगरी आठळून येतात असे काही प्रांत आहेत. असाच एक अनुभव येथील क्विन्सलॅण्डमधील एका महिलेला नुकताच आला. या महिलेच्या बेडवर 6 फूट लांबीचा विषारी साप लपला होता. ही महिला आपल्या बेडरुममधील चादर बदलण्यासाठी गेली होती. त्यावेळेस तिला बेडवर हा विषारी साप दिसला.
दारात टॉवेल टाकला आणि...
समोर आलेल्या माहितीनुसार हा ऑस्ट्रेलियामध्ये सापडणाऱ्या सर्वात विषारी सापांच्या प्रजातींपैकी ईस्टर्न ब्राऊन (Eastern Brown Snake) प्रजातीचा साप आहे. बिछान्यावर साप पाहताच या महिलेने बेडरुमचा दरवाजा लावला. त्यानंतर तिने हा साप दाराच्या फटीतून बाहेर येऊ नये म्हणून दाराजवळ टॉवेलही टाकला. त्यानंतर या महिलेने सर्पमित्रांना फोन केला.
6 फूट लांबी
हा साप पकडण्यासाठी गेलेल्या जॅचेरीज रिचर्ड्स यांनी नेमका घटनाक्रम सांगितला आहे. "मी कॉल आल्यानंतर तातडीने या महिलेच्या घरी पोहोचलो तेव्हा ती दारातच माझी वाट पाहत होती. मी बेडरुममध्ये गेलो ज्या ठिकाणी या महिलेने साप पाहिला होता. मी धक्का देऊन दरवाजा उघडला त्यावेळी मला समोरच्या बेडवर हा साप दिसला. तो साप दाराच्या दिशेनेच पाहत होता. हा साफ 6 फूट लांब होता," असं रिचर्ड्स यांनी सांगितलं. रिचर्ड्स यांनीच या सापाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
उष्णता असल्याने घरात आला
बाहेरील उष्णतेपासून वाचण्याच्या उद्देशाने हा साप घरात शिरला असेल असा अंदाज रिचर्ड्स यांनी व्यक्त केला आहे. सापाला पकडून रिचर्ड्स यांनी जवळच्या झुडपांमध्ये सोडून दिलं. रिचर्ड्स यांनी या महिलेने ज्यापद्धतीने परिस्थिती हाताळली तशीच समयसूचकता इतरांनाही दाखवावी असंही म्हटलं आहे. हा साप ईस्टर्न ब्राऊन प्रजातीचा असल्याचंही रिचर्ड्स यांनी सांगितलं. हा जगातील दुसरा सर्वाधिक विषारी साप आहे. युनिव्हर्सिटी ऑफ मेलबर्नमधील ऑस्ट्रेलियन वेनम रिसर्च यूनिटच्या आकडेवारीनुसार हा जगातील दुसरा सर्वात विषारी साप आहे.
हा सापला चावला तर...
ईस्टर्न ब्राऊन या सापाचं विष हे न्युरोटॉक्सिक पद्धतीचं असतं. म्हणजेच हा साप चावल्यानंतर व्यक्तीच्या हृदयावर, फुफ्फुसांमधील नसांवर परिणाम होतो आणि श्वास गुदमरतो. सुर्यप्रकाश असताना या प्रजातीचे साप फार सक्रीय असतात. आपल्याला धोका आहे असं वाटल्यास ते दंश करतात. अशापद्धतीचा साप दिसून आला तर स्वत: त्याला हुसकावून लावण्याचा किंवा हात लावण्याचा प्रयत्न न करता तज्ज्ञांची किंवा प्राणीमित्रांची मदत घ्यावी असं आवाहन प्रशासनामार्फतही केलं जातं.