लोकप्रतिनिधींच्या जिभेला हाड नाही का?

भाजपचे वादग्रस्त आमदार राम कदम आपला मोबाईल नंबर जनतेला देताना मुलीला पळवून आणण्यास मदत करू असं सांगितलं आणि एका वादाला तोंड फुटलं.

Updated: Sep 11, 2018, 04:27 PM IST
लोकप्रतिनिधींच्या जिभेला हाड नाही का? title=

लेखक - जयंत माईणकर : भाजपचे वादग्रस्त आमदार राम कदम आपला मोबाईल नंबर जनतेला देताना मुलीला पळवून आणण्यास मदत करू असं सांगितलं आणि एका वादाला तोंड फुटलं.

त्यापाठोपाठ राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी एका कार्यक्रमात बोलताना राजकीय नेत्यांनी छबी  बिघडविण्यास प्रसार माध्यम जबाबदार असल्याचा जावईशोध लावला. दरम्यान माजी मंत्री सुबोध सावजी यांनी कदमांची जीभ छाटणाऱ्यास चक्क पाच लाखाच्या बक्षिसाची घोषणा केली. 

कदमांनी मुलगी पळवायला  मदत करू हे म्हणणं जेवढं चुकीचं तितकच किंवा त्याहून जास्त चुक तावडेंनी राजकारण्यांच्या खराब छबिला  प्रसार माध्यमांना जबाबदार धरणं आहे.

मात्र अजूनही भाजपच्या एकही नेत्याने राम कदम यांचा निषेध केला नाही, की पक्षाने अद्याप त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही.

लोकप्रतिनिधीनी अशा प्रकारची वादग्रस्त विधाने जा करावीत हा खरा प्रश्न आहे.

२०१३ साली भाजपचे माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी आपण  २००९ साल च्या लोकसभा निवडणुकीत आपण आठ कोटी रुपये खर्च केल्याची कबुली एका कार्यक्रमात गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, नितीन गडकरी, आणि विनय सहस्त्रबुद्धे यांच्यासमोर दिली.

२०१४ साली निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही माथाडी कामगारांच्या समोर भाषण करताना प्रथम आपल्या गावात साताऱ्याला जाऊन मतदान करा, नंतर शाई पुसून मुंबईत मतदान करा असा सल्ला दिला.

देशाच्या आणि राज्याच्या कायदेमंडळात कायदे बनविणाऱ्या लोकप्रतिनिधी कडून अशा प्रकारची कायदा मोडणारी वाक्य बाहेर पडणे ही फार मोठी शोकांतिका आहे.

स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी तर एकदा चक्क गँगस्टर अरुण गवळी आमच्याकडे तर दाऊद इब्राहीम काँग्रेसकडे अशी मल्लिनाथी केली हाती.

भाजपचे अनेक नेते महात्मा गांधी, प. जवाहरलाल नेहरु यांच्याविषयी अनेक वादग्रस्त विधान करतात. 

गांधींचा मारेकरी नथुराम गोडसे याचे पुतळे उभारावेत असं सागण्यापर्यंत अनेकांची मजल आजही जाते.

त्रिपुराचे मुख्यमंत्री विपलाब देव यानी इंटरनेट महाभारत काळापासून होते असे, म्हणत आपली बौद्धिक पातळी दाखवून दिली. तर मानव संसाधन राज्यमंत्री सत्यपाल सिंग यांनी तर चक्क चार्ल्स डार्विन च्या उत्क्रांतीच्या सिद्धांतावर आक्षेप घेत माकड हे माणसाचे पूर्वज नव्हते असा दावा केला.

काँग्रेसचे दिग्गज नेते दिग्विजय सिंग यांनी आपल्यावह पक्षाच्या खासदार मीनाक्षी नटराजन याच्याविषयी टंच माल असा शब्द वापरला. त्याच्याबद्दल नटराजन यानी आक्षेप घेतला नाही मात्र भाजपच्या नेत्यांनी कोल्हे कुई सुरू केली. एकूणच लोकप्रतिनिधी नी आपल्या जिभेला आवर घातला पाहिजे.