जगण्याच्या धडपडीत सुटलेल्या मित्रांसाठी....!

रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीचे नाते किती व्यापक आणि किती प्रेमळ असते हे मित्र आहेत त्यांना वेगळे सांगायची गरज नाही.

Updated: Nov 13, 2017, 05:31 PM IST
जगण्याच्या धडपडीत सुटलेल्या मित्रांसाठी....! title=

कैलास पुरी, झी मिडिया, पिंपरी चिंचवड : मैत्री या शब्दात अनेक भावना लपलेल्या आहेत. मैत्रीवर अनेक चित्रपट, कादंबऱ्या लिहल्या गेल्या आहेत. रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीचे नाते किती व्यापक आणि किती प्रेमळ असते हे मित्र आहेत त्यांना वेगळे सांगायची गरज नाही.

 मैत्रीची किती तरी उदाहरण आपण पाहत आलोय, पाहतोय. अगदी महाभारतातील दुर्योधन कर्णाच्या मैत्री पासून तुमच्या गावातल्या पांडू गणपत च्या मैत्री पर्यंत...! ज्याला एक तरी मित्र आहे तो खरंच भाग्यवान...! 

हे नाते श्रेष्ठ आहे यात कुणालाही शंका नाही आणि या नात्यावर अनेक दिग्गजांनी लिहलंय त्यामुळे त्यावर लिहण्याचा प्रश्नच नाही.

मी लिहतोय कारण मला प्रश्न पडलाय तो वेगळाच. जगण्याच्या संघर्षात, जिथे सर्व काही व्यावसायिक झालंय, जिथे प्रचंड स्पर्धा निर्माण झालीय अशा काळात खरंच चित्रपट, कथा कादंबऱ्यात आढळणारे जीवलग मित्र वास्तवात आहेत का आणि असलेच तर किती...!

अर्थात मला हा प्रश्न पडला एका कॉल मुळे.. काही दिवसांपूर्वी एक फोन आला...त्याने विचारले ओळखल का..? माझे उत्तर अर्थात नाही...! मग त्याने नाव सांगितले आणि स्मरण शक्तीला थोडासा जोर लावल्यानंतर मला आठवलं. 

हा तर बालपणीचा मित्र तो..तब्बल १० वर्षांनी आलेला त्याचा कॉल..भांडण नाही, तंटा नाही पण दोघांचा संवाद हळू हळू कमी झालेला.. एवढा कमी की कधी घरच्यांपेक्षा अधिक वेळ घालवलेल्या या मित्रा बरोबर तब्बल १० वर्षांनी बोलणे झाले. बरे वाटले. 

मग डोक्यात विचार सुरु झाला. हा तर माझा जीवलग मित्र. मग झाले काय..एवढा दुरावा आला कसा... कॉलेज नंतर काय करायचे या विचारात पुण्याला आलो. तो पर्यंत कधी मध्ये ल्यांडलाईन वरून बोलणं व्हायचे..नंतर तो त्याच्या कामाच्या व्यापात गुंतत गेला आणि मी बोलणे कमी कमी होत गेले ते संपले कधी हे कळलंच नाही..! 

आता हे माझे घडले असे सर्वांचे घडले असेल असे नाही. अनेकजण त्यांची नाती जपण्यात यशस्वी होतात हे खरेच आहे..पण त्या निमित्ताने मला आणखी प्रश्न पडले. अरे आपला जिवलग मित्र कधी दूर गेला हे कळलं नाही तर आपण ज्यांना त्याच्या नंतर भेटलो त्यातले आपले किती जीवलग मित्र...आणि हा विचार करताना मात्र थोडेसे डोके जड झाले. 

जीवलग म्हणावे असे मित्र फार म्हणजे अगदीच बोटावर मोजण्या इतकेच आहेत असे वाटायला लागले...! परत हे माझे...! अनेकांची यादी खूप मोठी असू शकते...! मग पुन्हा विचार आपले काही चुकतंय की सध्या कमी अधिक प्रमाणात सर्वानाच हा प्रश्न पडलाय...!

आपण लहानपणी मित्रांबरोबर एकत्र शाळेत जातो... अनेक जण सोबत असले तरी काही मोजक्या सवंगड्या बरोबर आपले जमते. पुढे मोठे होऊ तशी मैत्री बहरत जाते. कॉलेज ला एकत्र राहिलात तर प्रश्नच नाही. पण जर कॉलेज ला वेगळे झालात तर तुम्हाला कॉलेज मध्ये वेगळे मित्र भेटतात. मग तुमचा बालपणीचा मित्र हळू हळू सर्कल बाहेर जातो. 

गावी गेलाच तर पुन्हा फिरणे वगैरे होते पण सुरुवातीचा चार्म हरवत जातो. कॉलेज मध्ये ही सर्कल असले तरी त्यातले खूप जवळचे होतात असे ही नाही. कॉलेज च्या भावविश्वात रमताना गावाकडच्या मित्राकडे एकीकडे दुरावा वाढत जातो आणि जे कॉलेज मध्ये आहेत ते नोकरी निमित्त विखुरले जातात.

सुदैवाने मोबाईल मुळे संवाद राहतो. पण कामाचा व्याप, कौटुंबिक जबाबदारी आणि कमालीची स्पर्धा या मुळे दुसरा विचार करायला वेळ मिळत नाही आणि मग वीकेंडला होणारे कॉल पंधरा दिवसांवर आणि नंतर महिन्यांवर नंतर केवळ दिवाळी आणि नववर्षापर्यंत लांबतो. त्यातून एखादा मित्र रेग्युलर टच मध्ये असला तर ते सुदैवच. पण दुरदैवाने ही यादी खूप पुढे सरकत नाही.. किमान माझी तरी...!

हे झाले कॉलेज जीवनाच्या मित्रांचे. जिथे काम करता तिथे मित्र होतातच की. पण एकाच ठिकाणी किंवा एकाच क्षेत्रात काम करत असाल तर मित्र कमी आणि स्पर्धा अधिक या स्तिथीचा अनेकांना सामना करावा लागतो. काही जण तुमच्या कर्तृत्वाचे कौतुक करतात आणि तुमचे मित्र होतात. 

पण काही जणांना कर्तृत्व तर नसते पण त्यांना तुमचे कर्तृत्व ही मान्य नसते. मग असे कर्तृत्व नसलेले, अल्पसंतुष्ट एकत्र येतात आणि तुमच्या विरोधात कारस्थान करण्यात धन्यता मानतात. त्यांच्या कट कारस्थानांनी तुम्ही हतबल व्हावे, तुमची चिडचिड व्हावी असे उद्योग ही मंडळी करतात.

पण तुम्ही तरी ही बधला नाही तर असे लोक सर्वात पहिले तुमचे शक्ती स्थळ असलेल्या व्यक्तीला तुमच्या पासून फोडण्याचा प्रयत्न करतात. चुकून तो फूटलाच तर मग त्यांचे फावतेच. या सर्व घडामोडी मध्ये जो तुमच्या जवळ टिकतो तो तुमचा मित्र... आता ही संख्या किती.. हे तुम्ही विचार करा...!                                                        

हे वाचल्यावर तुम्हाला वाटत असेल की मला मित्रच नाहीत. तसे काही नाही. सुदैवाने मला ही मित्र आहेत भले ते बोटावर मोजण्या इतके का असेनात. पण प्रत्यक्षात अनेकांच्या जीवनात काय घडते हा मांडण्याचा हा हेतू. माझ्या ऑफिस मध्ये असे घडते असे तुम्हाला वाटत असेल तर ते ही चुकीचे. पण माझ्या पत्रकारितेच्या क्षेत्रात हा अनुभव आलाय हे मात्र खरे. 

या स्पर्धेच्या युगात ते ओघाने होणार ते आलेच. पण एवढ्या गदारोळात अजून ही माझे मित्र असलेल्या मयूर, सचिन, बंटी या बालपणीच्या मित्रांचा, माझ्याच क्षेत्रात काम करत असून ही सर्व चढ उतारात माझ्या बरोबर असलेल्या संदेशचा आणि या क्षेत्रामुळे माझी मैत्री झालेल्या प्रसाद कुलकर्णी यांच्या मैत्रीचा मला हेवा आहे. 

इतर ही अनेक मित्र आहेत पण त्यांचे नाव घेतलेले त्यांना आवडणार नाही. आता एका कॉल मुळे माझे जीवलग मित्र किती याचा साक्षात्कार करून दिलेल्या मित्राला मी आता न चुकता कॉल सूरु केलाय. 

कॉलेज मधले, पहिली नोकरी करतानाचे, एकाद्या ठिकाणी वास्तव्यास असताना झालेल्या मित्रांना मी फोन करायला सुरुवात करतोय. तुम्ही ही कामाच्या व्यापात, स्पर्धेच्या युगात जीवनाशी संघर्ष करताना काही मित्र मागे सोडले असतील तर उचला फोन आणि करा डायल....!