स्पिन्नर्सची चर्चा करून फास्ट बॉलर्सनी सिरीज जिंकण्याचा इंग्लडचा डाव?

इंग्लंड विरुद्धची भारताची 4 कसोटी सामन्यांची मालिका 5 फेब्रुवारी पासून सुरू होत आहे. पहिले दोन सामने चेन्नईला तर पुढचे दोन अहमदाबादच्या

Updated: Feb 4, 2021, 03:44 PM IST
स्पिन्नर्सची चर्चा करून फास्ट बॉलर्सनी सिरीज जिंकण्याचा इंग्लडचा डाव? title=

रवी पत्की, क्रिकेट विश्लेषक : इंग्लंड विरुद्धची भारताची 4 कसोटी सामन्यांची मालिका 5 फेब्रुवारी पासून सुरू होत आहे. पहिले दोन सामने चेन्नईला तर पुढचे दोन अहमदाबादच्या नवीन स्टेडियम मध्ये होणार आहेत. दोन्ही संघ जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी पात्र होण्याकरता ह्या सिरीजकडे अत्यंत गांभिर्याने पहात आहेत. भारताला गुण तक्त्यात न्यूझीलंडला मागे टाकायचे असेल तर 3 कसोटी जिंकाव्या लागतील किंवा 2 जिंकून 2 अनिर्णित ठेवाव्या लागतील. 

इंग्लंड हा देश क्रिकेटमध्ये कसोटी सामन्यांना सर्वाधिक महत्व देतो. त्यांच्या दृष्टीने कसोटी क्रिकेटच्या अंतिम सामन्यात पोहचणे हा प्रतिष्ठेचा विषय आहे. कसोटी म्हणजे त्यांचा जीव की प्राण. त्यांच्याकडे आत्तापासून डिसेंबरमधील अँशेसची चर्चा सुरू झाली आहे.

इंग्लंड विरुद्ध भारतात खेळल्या गेलेल्या शेवटच्या पाच मालिकेत भारताने 8 सामने जिंकले आहेत, तर इंग्लंडने 3. शेवटच्या मालिकेत(2016)भारताने पाच सामन्यांची मालिका 4-0 अशी जिंकली होती. ज्यात कोहलीच्या बॅटिंगचा महत्वाचा वाटा होता. इंग्लंड ने अँडरसन, वोक्स हे फास्ट बॉलर्स तर मोईन अली आणि आदिल रशीद हे स्पीन्नर्स वापरले होते.

2012 साली पानेसर आणि ग्रॅम स्वान यांच्या स्पिन बॉलिंगने भारताला चांगलेच सतावले होते आणि इंग्लंड ने भारतात येऊन भारताला 2-1 असे हरवले होते. त्या मालिकेनंतर आणि भारत इंग्लंड मध्ये गेल्यावर तिथे मोईन अलीला ज्या प्रकारे भारतीय फलनदाज खेळले.

 त्यावरून भारतीय फलनदाजी आधीच्या सारखी स्पिन गोलनदाजी उत्तम खेळत नाही ही थिअरी इंग्लंड मध्ये रूढ झाली आणि त्यात बरेचसे तथ्य आहे. भारतीय फलनदाज 2010 नंतर ऑफ स्पिन्नर्सना आणि लेफ्ट आर्म स्पिन्नर्सना हुकमतीने खेळलेले दिसलेले नाहीत.

खरे तर गंभीर,सेहवाग,गांगुली नंतर स्पिन्नर्सना पुढे येऊन खेळण्यापेक्षा क्रिज मधून खेळण्याकडेच कल दिसतो.त्यामुळे उगाचच नेथन लायन,मोईन अली आपल्या डोक्यावर बसले. स्पिन्नर्सनी भारताविरुद्ध संयमाने गोलनदाजी टाकली तर निर्णायक यश मिळू शकते असे इंग्लंड मधिल धुरीणांचे मत आहे. 

प्रश्न आहे तो आत्ता त्यांच्याकडे असलेल्या स्पिन्नर्सच्या दर्जाच्या. डॉम बेस हा ऑफसपीनर ग्रॅम स्वानच्या आसपास नाही आणि जॅक लीच हा लेफ्ट आर्म स्पिनर पानेसर इतका प्रभावी नाही. 

ह्या स्पीन्नर्सनी नुकतीच श्रीलंकेत मालिका जिंकून दिलेली असली तरी सद्ध्या श्रीलंकेच्या आणि भारताच्या फ्लनदाजीच्या दर्जात जमीन आसमानचा फरक आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. इंग्लंडचे स्पिन बॉलर्स अननुभवी आहेत हे इंग्लंड व्यवस्थापनास माहीत आहेच. 

मुद्दाम भारतास स्पिनची सतत आठवण करून देऊन गनिमी काव्याने अँडरसन,आर्चर, ब्रॉड, वोक्स यांच्या पेस आणि स्विंग वर सामने जिंकायचे असे कारस्थान इंग्लंड शिजवत असल्यास नवल नाही.शेवटी ब्रिटिशच ते. 

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विजिगिशु वृत्तीने विस्मयकारक विजय मिळवलेल्या भारतीय संघाचे मनोधैर्य गगनाला भिडणारे असेल. गिल,राहुल,अगरवाल,कोहली,रहाणे स्पीन्नर्स वर आक्रमण करणारे आहेत. हे सर्व फलनदाज आणि पुजारा फास्ट बॉलर्सना निडरपणे खेळतात. 

इंग्लंच्या फास्ट बॉलर्स ना विकेटस नाही मिळाल्या तर इंग्लंडचे सद्धयाचे स्पिनर्स भारताच्या 20 विकेट्स स्वस्तात काढू शकतील असे वाटत नाही.त्या उलट भारताचे अश्विन,कुलदीप यादव,अक्षर पटेल इंग्लंड फ्लनदाजाना फार स्थिरावू देतील असे वाटत नाही. रूट आणि बटलर हे दोघे स्पिन उत्तम खेळतात.पण बटलर पहिल्या सामन्यानंतर मायदेशी परतणार आहे.

दोन्ही संघांचा,कंडिशन्सचा,खेळपट्टय्यांचा,अलिकडच्या कामगिरीचा,फॉर्मचा विचार करता भारताला ही मालिका जिंकणे अवघड नाही असे वाटते. कम ऑन इंडिया.